Sun, Oct 20, 2019 11:48होमपेज › Kolhapur › यड्राव दरोडा; चौघांना अटक

यड्राव दरोडा; चौघांना अटक

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:11AM

बुकमार्क करा
यड्राव : वार्ताहर

शिरोळ तालुक्यातील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील सिद्धार्थ मिल्क व स्नेहा नॅचरल वर्ल्ड या दुधावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पातून पूर्वी कामास असलेल्या कर्मचार्‍यांनी सुरक्षा रक्षकाला हाताशी धरून सुमारे 86 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी रात्री उशिरा चौघांना अटक केली. सुशांत आनंदा तोडकर (वय 29, रा. तांदूळवाडी, जि. सांगली) पांडुरंग बाळासो गायकवाड (29, रा. जांभळी, ता. शिरोळ), राकेश रवींद्र मोरे (22, रा. जांभळी), अभयकुमार धनपाल कुडचे (35, रा, हरोली, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. अभिनंदन सुभाष पाटील (वय 33, रा. साखरे मळा उदगाव, ता. शिरोळ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी  विक्री केलेली मशिनरी जप्त केली आहे. 

पार्वती औद्योगिक वसाहतीमधील सिद्धार्थ मिल्क प्रॉडक्टस् व स्नेहा नॅचरल वर्ल्ड ही  दुधावर प्रक्रिया करणारी कंपनी मार्च 2017 पासून बंद अवस्थेत आहे. दूध पावडरचे दर घसरल्याने आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे कंपनी बंद आहे. त्यामुळे अनेक बँकांसह कर्मचार्‍यांची देणी असल्याची चर्चा आहे. या कंपनीची सुरक्षेची जबाबदारी एबीके एचआर सर्व्हिसेस या कंपनीकडे आहे. या कंपनीत असलेल्या पूर्वाश्रमीच्या एका कर्मचार्‍याने सुरक्षा यंत्रणेला हाताशी धरून किर्लोस्कर व कला जनसेट कंपनीचे 4 जनरेटर, दूध थंड करण्याचे बल्क, मिल्क कुलरचे 12 नग, 9 बॅटरी, स्टीमपाईपचे 10 नग, 150 एचपीच्या विद्युत मोटर असा 80 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल वेळोवेळी लंपास केला.

ही घटना गुरुवारी कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्याने ही बाब त्यांनी तत्काळ चेअरमन ज्ञानेश्‍वर साळुंखे यांना सांगितली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री केली व अभिनंदन पाटील यांना फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होण्याआधी पोलिसांनी एका संशयीताला बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन चोरीची माहिती घेतली. त्याने अनेकांची नावे उघड करीत गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय या कंपनीतील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही उच्चपदस्थ अधिकार्‍यांची नावेही  चर्चेत आहेत.  पोलिसांनी  इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, पुणे अशा विविध ठिकाणी जाऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला.