Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Kolhapur › 'कर्जमाफीचे अपयश झाकण्यासाठी सीएमना चुकीची दिली जाते'

'कर्जमाफीचे अपयश झाकण्यासाठी सीएमना चुकीची दिली जाते'

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 2:06AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

2008 च्या कर्ज माफीत कर्ज मर्यादेचा निकष नसल्याने अपात्र केलेले 112 कोटी रुपये उच्च न्यायालयाने पात्र ठरवले. असे असताना सहकार व आयटी विभागाच्या अधिकार्‍यांनी कर्जमाफीचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. या आधारे मुख्यमंत्र्यांनी केडीसी कर्जमाफीबाबत जे वक्तव्य केले आहे ते उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असे मत केडीसी बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत आपण सोमवारी विधानसभेत याच विषयावर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केडीसी बँकेत 2008 ची कर्जमाफीची प्रकिया राबवताना घोटाळा झाला. युवराज पाटील यांना 38 लाखांची कर्जमाफी झाली. तत्कालिन आमदारांच्या घरातील आठ लोकांना कर्जमाफी मिळाली, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केला. यावर बोलताना आ. मुश्रीफ म्हणाले, 2008 च्या कर्जमाफीबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. मुळात ही कर्जमाफी थकबाकीदारांनाच देण्यात आली. या कर्जमाफीत कर्ज मर्यादेचा निषकच नव्हता, तरीही नाबार्डने तपासणी करून क.म.पेक्षा अधिक असलेले 112 कोटी नामंजूर केले.

नाबार्डच्या निर्णयाविरोधात 67 शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शेतकर्‍यांचे म्हणणे ग्राह्य धरून नाबार्डला संबंधित शेतकर्‍यांचे पैसे देण्याचे आदेश दिले. याबाबत अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे योग्य नाही. 

मुख्यमंत्र्यांनी युवराज पाटील यांच्या कर्जमाफीचा उल्लेख केला. मात्र पाटील यांना एक रुपयाची कर्जमाफी मिळालेली नाही. त्यांच्या मुलाला मात्र 10 लाखांची कर्जमाफी मिळाल्याचे आ. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.  

200 शेतकर्‍यांसाठी 40 हजारांना शिक्षा

नाबार्डने 200 बड्या शेतकर्‍यांसाठी 40 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी हाणून पाडली. 112 कोटी अपात्र रकमेतील 39 हजार 649 शेतकर्‍यांचे कर्ज हे 50 हजार रुपयांच्या आतील होते. 50 ते 1 लाख कर्ज असणारे 2728, 1 ते 2 लाख कर्जवाले 1383, 2 ते 5 लाख असणारे 700, 5 ते 10 लाख असणारे 156, 10 ते 20 लाख असणारेे 36 तर 20 लाखांवर कर्ज असणारे 7 शेतकरी होते, असे. आ. मुश्रीफ यांनी सांगितले.