Tue, Jul 23, 2019 17:25होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू : खा. महाडिक

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू : खा. महाडिक

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या उपस्थितीत रेल्वेच्या विविध प्रश्‍नांबाबत शुक्रवारी पुण्यात खासदारांची बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागातील खासदारांची संयुक्‍त बैठक आज, शुक्रवारी बोलविण्यात आली होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार सर्वश्री विजयसिंह मोहिते-पाटील, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, संजय पाटील, श्रीरंग बारणे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव-पाटील, सदाशिव लोखंडे, शरद बनसोडे, रवींद्र गायकवाड उपस्थित होते.

या बैठकीत खा. महाडिक यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत विचारणा केली. त्यावर रेल्वे प्रशासनाने लेखी उत्तर दिले. या मार्गासाठी भूसंपादन पूर्ण झालेले नाही. तसेच या मार्गासाठी केंद्र शासनाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहेत, त्या अद्याप घेतलेल्या नाहीत. भूसंपादन आणि परवानगीचा प्रश्‍न मार्गी लागताच या मार्गाचे काम तातडीने सुरू केले जाईल, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

याबाबत रेल्वे अधिकार्‍यांसमवेत रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली जाईल, आवश्यक परवानग्या घेण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे खा. महाडिक यांनी बैठकीत सांगितले. यावेळी कोल्हापूर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या प्रवासी उड्डाणपूल, प्लॅटफार्म विस्तारीकरण, पादचारी उड्डाणपूल आदी कामांबाबत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण, पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण वेळेत पूर्ण होण्याबाबत विशेष लक्ष द्या, अशी सूचना सर्व खासदारांनी केली. या बैठकीला पुण्याचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर, सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र म्हलोत्रा आदींसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.