Wed, Mar 20, 2019 09:13होमपेज › Kolhapur › नागरी विकास प्राधिकरणाचे काम लवकरच : पालकमंत्री

नागरी विकास प्राधिकरणाचे काम लवकरच : पालकमंत्री

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 12:34AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाचे काम लवकरच सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार असून, प्राधिकरणाचे कामासाठी गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, प्राधिकरणामुळे अडकलेल्या बांधकाम परवान्याबाबत तातडीने निर्णय घ्या, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना केल्या.

कोल्हापूर महापालिका हद्दवाढीऐवजी महापालिका आणि त्याच्या लगतच्या 43 गावांसाठी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाची घोषणा झाली, तरी त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. 

प्राधिकरणाची अधिसूचान राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून समाविष्ट गावातील बांधकाम परवाने देण्याची प्रक्रिया स्थानिक प्रशासनाने बंद केली आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून, प्राधिकरणाचे काम सुरू होईपर्यंत बांधकाम परवाने पूर्वीप्रमाणेच स्थानिक यंत्रणेद्वारे द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.

दरम्यान, प्राधिकरणाबाबत विचारता, पाटील म्हणाले, कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाचे काम लवकरच सुरू होईल. याकरिता येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. यानंतर प्राधिकरणाचे कामकाज सुरू होण्यास फार विलंब होणार नाही. येत्या काही दिवसांत प्राधिकरणाचे काम सुरू होईल. प्राधिकरणासह जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.