Mon, Jun 17, 2019 14:28होमपेज › Kolhapur › तांत्रिक मान्यतेत अडकले फायर ऑडिट

तांत्रिक मान्यतेत अडकले फायर ऑडिट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेली जिल्हा परिषद  इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्यासाठी 40 लाखांची तरतूद करुनही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. गेले वर्षभर टेंडर, तांत्रिक मान्यता एवढ्यापर्यंतच प्रशासनाची मजल गेली आहे. फायर ऑडीट नसल्याने 2 लाख 40 हजार महत्त्वपूर्ण फाईल्स, तीन मजली इमारतीतील 14 विभागांतील 1100 कर्मचारी आणि रोज शेकडोंनी येणार्‍या अभ्यागतांचा जीव धोक्यात आहे. 

मंत्रालयात आग लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून जिल्हा परिषदेनेही फायर ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष आर्थिक तरतूद आणि शासनाच्या मान्यतेत गेले. मागील वर्ष टेंडरच्या माध्यमातून कंत्राटदाराने झुलवले. अखेर हे टेंडरच रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. या अर्थसंकल्पीय सभेत पुन्हा सुधारित 40 लाखांची तरतूद मंजूर केली.

टेंडर काढण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेणे गरजेचे असते. गेल्या वर्षी ही मान्यता घेण्यात आली होती; पण टेंडर प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने  मान्यतेचा  उपयोग झाला नाही. आता पुन्हा  मुख्य अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता मिळावी यासाठी बांधकाम विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

वर्षभर नुसतीच टेंडर प्रक्रिया

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात फायर ऑडिटसाठी 40 लाखांची तरतूद मंजूर करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाकडून टेंडर प्रक्रिया सुरू केली गेली. तीन वेळा टेंडर प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्यावेळी प्रसिद्ध झालेल्या टेंडरमध्ये एका कंत्राटदाराची 35 लाखांची सर्वात कमी निविदा राहिल्याने त्याच्याकडे काम सोपवण्यात आले. जीएसटीचे कारण पुढे करत या कंत्राटदाराने जानेवारीमध्ये काम करू शकत नसल्याचे अधिकृतरित्या जि.प.ला कळवले. 

कागदपत्रांची सुरक्षितता महत्त्वाची

जिल्हा परिषदेत कागदपत्रांची सुरक्षिता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सध्या असलेल्या अभिलेखा कक्षावरच कॅन्टिन सुरू आहे. त्यामुळे या कक्षाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. जि.प. ने नवीन 50 लाखांचा प्रस्ताव तयार  आहे; पण निश्‍चित केलेल्या जागेतील वृक्ष तोडण्यासाठी परवानगी  घेतली नसल्याने बांधकामास अवधी जाणार आहे. त्यामुळे  कागदपत्रे सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.  

Tags : Kolhapur, Kolhapur News, Work, 40 lakh rupees,  construction of fire prevention system


  •