Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Kolhapur › शेंडा पार्कात होणार महिला रुग्णालय

शेंडा पार्कात होणार महिला रुग्णालय

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:30AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यासाठी मंजूर झालेले महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय शेंडा पार्कात उभारण्याची शक्यता आहे. तसा जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे. यामुळे लवकरच या परिसरात ‘मेडिकल हब’ साकारण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने 17 जानेवारी 2013 ला कोल्हापूर जिल्ह्यासाठी 100 खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय व 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर केले. यानुसार आवश्यक तो निधी, कर्मचारी याचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, गेली पाच वर्षे यासाठी जागेचा शोध सुरू होता. शेंडा पार्क परिसरात आरोग्य विभागाची जागा आहे. यातील काही जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी आरोग्य विभागाची अन्य कार्यालयेही आहेत. याच परिसरात महिला व जिल्हा रुग्णालय उभी करून हा परिसर ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित करण्याचा विचार सुरू आहे.

जिल्ह्यासाठी 100 खाटांचे महिला रुगालय मंजूर होऊन पाच वर्षे उलटले, तरी त्याबाबत काहीच हालचाली होत नव्हत्या. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या हालचालींना वेग आला आहे. शेंडा पार्क परिसरातील आरोग्य विभागाच्या जागेची मोजणी करण्यात आली असून, महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय याकरिता आवश्यक जागा निश्‍चित करण्यात आली आहे. उपलब्ध जागा आणि आवश्यक जागा यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.

महिला रुग्णालयासाठी 10 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तर, 100 खाटांचे मंजूर झालेल्या जिल्हा रुग्णालयाचा भविष्यात 300 खाटांपर्यंत विस्तार वाढवण्याचा विचार आहे. याद‍ृष्टीने जिल्हा रुग्णालयासाठी 25 एकर अशा एकूण 35 एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनानेही पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे महिला व जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्‍न यावर्षी निकालात लागण्याची शक्यता आहे.

शहरात सध्या सीपीआर रुग्णालय आहे. कसबा बावड्यात सेवा रुग्णालय आहे. त्यात महिला व जिल्हा रुग्णालयाची भर पडणार असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत गतीने प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.