Fri, Apr 26, 2019 00:14होमपेज › Kolhapur › ‘वुमेन्स फुटबॉल लिग’चे दिमाखदार उदघाटन

महाराष्ट्र क्विन्सची विजयी सलामी

Published On: May 22 2018 1:08AM | Last Updated: May 22 2018 1:08AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र क्विन्सने मल्टी वॉरिअर्सचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करून ‘वुमेन्स लिग’ फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. कोल्हापूर वुमेन्स फुटबॉल क्‍लब (केडब्ल्यूएफसी) आयोजित या स्पर्धेस सोमवारी प्रारंभ झाला. सामने पाहाण्यासाठी फुटबॉल शौकिनांसह क्रीडाप्रेमी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

छत्रपती शाहू स्टेडियमवर या स्पर्धेचे उदघाटन यशस्विनीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या’ (विफा) महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी ‘केएसए’चे सचिव माणिक मंडलिक, संभाजीराव पाटील-मांगुरे, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नितीन जाधव, प्रमोद पाटील, झुंजार सरनोबत, शरद माळी, चंद्रकांत नाईक, ओंकार जाधव, प्रकाश पाटील, रवी पाटील, डॉ. मुग्धा पाटील, बंटी सावंत आदी उपस्थित होते. संयोजन अमित साळोखे, सूर्यदिप माने, संजय चिले, अमित शिंत्रे, स्वालिया थोडगे, मृणाल शिंदे, रुकया थोडगे आदींनी केले. सुत्रसंचालक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले.

अंजू तमंगचे दोन गोल्स...

दुपारच्या सत्रातील पहिला सामना महाराष्ट्र क्विन्स विरुध्द मल्टी वॉरिअर्स यांच्यात रंगला सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. महाराष्ट्र क्विन्सकडून अंजू तमंग, मिशेल कास्टाना, सोनिया राणा, सुचिता पाटील, प्रणाली चव्हाण यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. तर मल्टी वॉरिअर्सच्या लौरा इस्टीबीओ, तेजस्विनी कोळसे, मुस्कान अत्तार, पूजा धुमाळ, पृथ्वी गायकवाड यांच्याकडून आघाडीसाठी झालेले प्रयत्न अपयशी ठरले. यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यामुळे उत्तरार्धातील चुरस अधिकच वाढली.  उत्तरार्धात सामन्यावर पूर्णपणे महाराष्ट्र क्विन्सचे वर्चस्व होते. 38 व्या मिनिटाला मिशल कास्टनने तर 40 व 56 व्या मिनिटाला अंजू तमगने सलग दोन गोल नोंदवत  संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. यापैकी एकाही गोलची परतफेड मल्टी वॉरिअर्सला करता आली नाही. अखेर सामना महाराष्ट्र क्विन्सने 3-0 असा जिंकला. 

छत्रपती शिवकन्या-आर.आर. चॅलेंजर्स तुल्यबळ...

छत्रपती शिवकन्या-आर.आर. चॅलेंजर्स यांच्यातील सामना तुल्यबळ झाला. सामन्यात आर.आर. चॅलेंजर्सकडून प्रतिक्षा मिठारी, अनुष्का खतकर, सोनाली साळवी, पूजा करमरकर यांनी तर छत्रपती शिवकन्या संघाच्या प्यारी झा-झा, शश्मीता परीडा, ऐश्‍वर्या हवालदार, स्मृध्दी कटकोळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्हीकडील भक्‍कम बचावामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागले. 

उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव...

सामन्यात उत्कृष्ट खेळ करणार्‍या अंजू तमंग (महाराष्ट्र क्विन्स), तेजस्विनी कोळसे (मल्टी वॉरिअर्स), रुपा मलिक (आर.आर. चॅलेंजर्स), मृणाल खोत (छत्रपती  शिवकन्या) यांना मान्यवरांच्या हस्ते एक हजारांचे गिफ्ट व्हाउचर देवून गौरविण्यात आले.