Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Kolhapur › महिलादिनी ऊसतोड  महिलेची  फडातच प्रसूती!

महिलादिनी ऊसतोड  महिलेची  फडातच प्रसूती!

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 09 2018 11:10PMहमीदवाडा : मधुकर भोसले

एकीकडे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती या पदस्थानी विराजमान होण्याबरोबरच कर्तृत्वाच्या विविध अवकाशात महिलांनी मारलेली भरारी हे अभिनंदनीय व अभिमानास्पद वास्तव एकीकडे असताना, दुसरीकडे जगण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणार्‍या माय-माऊलीदेखील आहेत. याचाच प्रत्यय आणून देणारी घटना जागतिक महिलादिनीच बस्तवडे (ता. कागल) येथे घडली. सुमारे 600 किलोमीटरवरून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ऊसतोड महिलेची प्रसूती जागतिक महिलादिनी फडातच झाली. विशेष म्हणजे, बाळ ही मुलगी आहे.

परभणी येथील या मजूर टोळीतील संबंधित महिला प्रसूतीच्या कालावधीतच होती, तरीही तिचे ऊस तोडणीचे काम सुरूच होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे ही टोळी पहाटे ऊस तोडणीसाठी शेतात दाखल झाली. सकाळी 10 नंतर या टोळीतील सौ. जयश्री अविनाश चव्हाण या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर लागलीच या महिलेची नणंद सौ. अरुणा व अन्य महिलांनी उसाच्या बाजूला आडोसा निर्माण करून ही नैसर्गिक प्रसूती केली.

प्रसूतीनंतर लगेचच निरोप दिल्यानंतर फडामध्येच नानीबाई चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दाखल झाली व त्यानंतर बाळंतीण व बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले. नैसर्गिक प्रसूती झाल्याने तसेच बाळ व आईची तब्येत चांगली असल्याने संबंधित कुटुंबाच्या आग्रहाखातर शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते परभणी येथील आपल्या गावी (आसोला, ता. जिंतूर) गेले. दरम्यान, प्रसूतीची तारीख एका दवाखान्यामध्ये आम्हाला सांगितली होती; पण त्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने काम करत असतानाच उसाच्या फडामध्ये पत्नीची प्रसूती झाल्याचे पती अविनाश बबन चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारावरून जगण्याच्या संघर्षात प्रसूतीसारखा संवेदनशील विषयसुद्धा या राबणार्‍यांच्या जीवनात कसा विदारक ठरतो आहे, हे स्पष्ट होते. ग्लोबलायझेशनच्या  काळात ‘इंडियातील भारताचे’ असेही एक वास्तव नजरेआड करता न येणारे आहे. 

आता मुलीच्या हाती कोयता देऊ नका
या प्रसूतीबद्दल दवाखान्यामध्ये आलेल्या नागरिकांना माहिती मिळताच काही जण उत्सुकतेपोटी बाळाला पाहण्यासाठी रूममध्ये येत होते. एका व्यक्तीने या बाळाच्या हातावर पैसे ठेवत चव्हाण दाम्प्त्याकडे पाहत सांगितले. तुम्ही आयुष्यभर राबत आला आहात. आता या मुलीच्या हाती कोयता देऊ नका. तिला खूप शिकवा. त्यावर ‘व्हय, व्हय आमचा मुलगा व ही मुलगी या दोन्हीसनीबी आम्ही शिकवणार हाय!’ असे चव्हाण यांनी सांगितले.