Fri, Jul 03, 2020 04:15होमपेज › Kolhapur › राशिवडेत महिलेची गळफासाने आत्महत्या

राशिवडेत महिलेची गळफासाने आत्महत्या

Last Updated: Jun 06 2020 1:09AM

File Photoराशिवडे : पुढारी वृत्तसेवा

जन्मोजन्मी हाच पती लाभू दे...अशी मागणी करणार्‍या वटपौर्णिमा व—ताच्या पूर्वसंध्येला पतीच्या दारूच्या व्यसनामुळे परप्रांतीय महिलेने गळफासाने जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचे केरळचे सर्वराज गुलस्वामी मारवार (वय 45) व पत्नी शिवगामी (35) येथील इंदिरानगर येथे राहत होते. फिरता भांडी व्यवसाय करत त्यांच्या कुटुंबाची गुजराण सुरू होती. सर्वराजची पहिली पत्नी केरळ येथे राहत आहे, तर त्याने शिवगामीसोबत प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. गुरुवारी सायंकाळी त्याने पत्नी शिवगामीकडे दारूसाठी  दोनशे रुपये मागितले. त्यामुळे दोघांत मोठा वाद झाला. तरीही तो पैसे घेऊन दारू पिण्यासाठी निघून गेला. त्यानंतर शिवगामीने खुर्चीवर खुर्ची रचत स्लॅबच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला. रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतलेल्या सर्वराजची ही घटना पाहून नशाच उतरली. त्याने तत्काळ घरमालक विक्रम डकरे यांना याची माहिती दिली. त्यानंतर सरपंच कृष्णात पोवार, पोलिसपाटील उत्तम पाटील यांनी पो.नि. उदय डुबल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. रात्री उशिरा सीपीआरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आणि अंत्यविधी पंचगंगा स्मशानभूमीत करण्यात आला. राधानगरी पोलिस अधिक तपास करत आहेत.