Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Kolhapur › राजकारणाशिवाय समाजकारण करता येते

राजकारणाशिवाय समाजकारण करता येते

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजकारणाशिवाय समाजकारण करता येते, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. संत गाडगे महाराज अध्यासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सोमवारी डॉ. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. 

आमदार व खासदार होण्यासाठी आतापर्यंत अनेक पक्षांकडून ऑफर आल्या; पण राजकारणविरहित समाजकारण करण्याची उर्मी आपल्यात पहिल्यापासूनच असल्याने आपण त्या ऑफर टाळल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, राजकारणाचे आणि पत्रकारितेचे बाळकडू आपल्याला वडील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्याकडून मिळाले. वडील 1954 मध्ये आमदार आणि संपादकही होते. त्यामुळे राजकारण आणि पत्रकारिताही जवळून पाहत होतो. विद्यार्थीदशेपासूनच आपण सामाजिक चळवळीत सक्रिय होतो. पश्‍चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेवेळी बाबासाहेब कुपेकर व मी पदाधिकारी होतो. या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्‍नांना हात घालत असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यात झोकून देऊन काम केले. 

कोल्हापूरचे अनेक प्रश्‍न आपल्याला जवळून माहिती आहेत. जोतिबा परिसर विकास, शाहू स्मारक भवन लोकवर्गणीच्या माध्यमातून मार्गी लावले. इतकेच नव्हे, तर लोकवर्गणीतूनच सियाचिनला सैन्य दलासाठी हॉस्पिटल बांधून दै. ‘पुढारी’ने अटकेपार झेंडा नेला.

कोल्हापूरच्या माणसांना मोठं होण्यासाठी जेवढे पाठबळ दिले तेवढेच कोल्हापूरचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण ताकद लावली, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, वि. स. खांडेकर यांच्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण दिल्लीत उपस्थित असताना एका संपादकांनी कोल्हापूरची माणसं जातीयवादी असल्याचे सांगत खांडेकरांचा सत्कार करण्याचे धाडस कोल्हापूरकरांमध्ये नसणार, असे बोलून दाखविले होते. कोल्हापूरला आल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाला सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत सुचविले; पण आणीबाणी असल्याने त्यांनी असमर्थता दर्शविली. अखेर आपण स्वतः पुढाकार घेऊन जाहीर नागरी सत्कार केला. त्यावेळी खांडेकरसुद्धा अचंबित झाले. पंचगंगेचा पूर पाहिला होता; पण आपल्या सत्काराला आलेला हा माणसांचा पूर पहिल्यांदाच पाहिल्याची प्रतिक्रिया खांडेकर यांनी त्यावेळी व्यक्‍त केली होती. अशी अनेक उदाहरणे आहेत, की आपण खेळाडूंपासून प्रत्येक क्षेत्रातील माणसाला बळ दिले आहे.

जोतिबा विकास आराखड्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यासाठी खास बैठक आयोजित केली होती. त्यावेळी समिती स्थापन करण्याचे ठरले. समितीच्या अध्यक्षपदासाठी सहा नावे पुढे आली; पण हा विकास लोकवर्गणीतून साधायचा आहे आणि त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी गोळा करायचा असल्याचे स्पष्ट होताच सर्व जण मागे सरले. त्यांच्याकडून पवार यांना आपले नाव सुचविण्यात आले. त्यावेळी आपण विकास समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि निधी संकलन समितीचे अध्यक्षपद आपणाकडे देण्याचे सुचविले. आपल्याकडे जबाबदारी येताच निधी संकलन आणि जोतिबा परिसर विकासाला सुुरुवात झाली. तोच प्रकार आता कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत सुरू असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा फोर्टीस कंपनीकडून तयार करून घेऊन त्याचे सादरीकरण आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांसमोर केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण करून निधीबाबत आग्रह धरला. सुमारे 2100 कोटी रुपयांचा हा आराखडा असून त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 95 कोटी आणि जोतिबा विकासासाठी 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास होणे आवश्यक असून त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून आपण दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून आवाज उठविला. अजूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खंडपीठ कृती समितीबरोबर केवळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण थांबत नाही, तर दररोज पाठपुरावा सुरू असतो. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांशी बैठकीतील निर्णयानुसार सध्या फाईल कोठे आहे आणि ती कोणाकडे पोहोचवायची याबाबत आपण संपर्क करीत असतो. काही दिवसांतच हा प्रश्‍न दृष्टिक्षेपात येईल. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोणकणातील मिळून सहा जिल्ह्यांसाठी आवश्यक असणारे खंडपीठ लवकरच मार्गी लागेल, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत लादण्यात आलेला टोल हटविण्यात दै. ‘पुढारी’चा सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला होता. त्याचा संदर्भ देत डॉ. जाधव म्हणाले, की आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी टोल लावण्यात आला, तो कधीच हटविला गेला नाही. कोल्हापूरचा टोल मात्र हटविण्यात आला. ही ताकद फक्‍त दै. ‘पुढारी’मध्येच असल्याचे अनेक अधिकारी आणि परजिल्ह्यांतील नेते बोलून दाखवत आहेत. कोल्हापूरवर अन्याय करणारा कोणताही प्रश्‍न असो, ते आपला स्वतःचा प्रश्‍न असल्याचे समजून आपण त्यासाठी झटतो आणि तो प्रश्‍न सोडवितो. त्यासाठी कोल्हापूरकरांचे पाठबळ आपल्याला नेहमीच लाभले आहे. ते असेच सदैव राहू दे, अशी अपेक्षा डॉ. जाधव यांनी व्यक्‍त केली.

प्रारंभी माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूरवर आलेले कोणतेही संकट परतवून लावण्याची ताकद केवळ डॉ. जाधव यांच्यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या आजवरच्या विकासात डॉ. जाधव यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्रीपासून अनेक पुरस्कार लाभले आहेत. संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार हे त्याचेच प्रतीक आहे. या पुरस्कारामुळे दै. ‘पुढारी’ आणि डॉ. जाधव यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा वाढला आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना असो, की सध्याचा ज्वलंत खंडपीठाचा प्रश्‍न असो, प्रत्येक प्रश्‍नात जातीने लक्ष घालून तो सोडविण्यासाठी धडपड करण्याची डॉ. जाधव यांची वृत्ती हेच कोल्हापूरकरांचे मोठे बळ आहे, असे आडगुळे यांनी सांगितले.

माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार यांनीही डॉ. जाधव यांचे तोंडभरून कौतुक केले. डॉ. जाधव यांच्या रूपाने एक लढवय्या संपादक आणि कार्यकर्ता कोल्हापूरला लाभला हे आमचे भाग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे कोल्हापूरचा गूळ, चप्पल, साज, मिसळ याची ओळख जगप्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरचा ‘पुढारी’ आणि त्याचे संपादक डॉ. जाधव हे देश-विदेशांत प्रसिद्ध असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी सांगितले. ‘पुढारी’चा आणि डॉ. जाधव यांचा गौरव म्हणजे कोल्हापूरचा गौरव असे येथील मनामनाला पटते, असेही त्यांनी गौरवोद‍्गार काढले.

याप्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी जाधव तसेच बाबा पार्टे, लालासो गायकवाड, संपतराव पाटील, सुभाष देसाई, किसन कल्याणकर, मनसेचे विजय करजगार, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोजखान उस्ताद, संपतराव पाटील यांची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख दुर्गेश लिंग्रस तसेच धर्माजी सायनेकर, चंद्रकांत बराले, सुनील पाटील, तानाजी पाटील, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, भाऊ घोंगळे, हेमंत डिसले, संजय वाईकर, हरी कांबळे, प्रकाश भोसले, संजय करजगार, बाळासो पाटील, विजयसिंह पाटील, रेहाना नगरकट्टी, बिलकीद सय्यद, माई वाडेकर, सुनीता राऊत, जहिदा मुजावर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सचिव रणजित जाधव, अरुण चोपदार, पिरोज काझी, शरद चव्हाण उपस्थित होते.