Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Kolhapur › ताकाला जाऊन मोगा का लपवायचा? : मंत्री खोत

ताकाला जाऊन मोगा का लपवायचा? : मंत्री खोत

Published On: Jun 18 2018 1:16AM | Last Updated: Jun 17 2018 11:43PMसावर्डे : वार्ताहर

गावा-गावांतील पिण्याच्या पाण्यासह स्थानिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात तालुकानिहाय ग्रामपंचायतींसह शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेणार आहे. यातून जनसंपर्क वाढविण्यात येणार असल्याची माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. तसेच ताकाला जाऊन मोगा लपविण्याची गरज नसून वेळ पडल्यास हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले. 

सावर्डे, लाटवडे, भादोले, भेंडवडे आदी गावांतील संपर्क दौर्‍या निमित्त खोत सावर्डे येथे बोलत होते. यावेळी उसाचा दर, तुरीची खरेदी, शेतकरी कर्जमाफी, रस्त्यासाठी निधी, शेती पाणीपुरवठ्याचे नियोजन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न याबाबत त्यांनी माहिती घेतली. कापूरवाडी येथे पिण्याची कोणतीही योजना नसल्याने दरवर्षी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करून शासनाचा निधी देण्याचे आश्‍वासन यावेळी खोत यांनी दिले. 

यावेळी ऊस, दूध, शेतीमालाच्या आंदोलनाबाबत बोलताना खोत यांनी नाव न घेता खा. राजू शेट्टी यांचा समाचार घेतला. हातकणंगले व शिरोळचा परिसर मला नवीन नाही. याच भागातून शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी होतो. आता तर सरकार, कारखानदार आपल्या बरोबरच आहेत. ज्यांनी नेहमीच संधीसाधू राजकारण केले त्यांना बाजूला करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन केले. 

यावेळी बबनराव पाटील, नितीन चव्हाण, उपसरपंच गोविंद पाटील, राजन चव्हाण, रयत क्रांतीचे शाखाध्यक्ष दत्ताजी पाटील, राजू देसाई, अजित पाटील, सदाशिव शेळके आदी उपस्थित होते.