Wed, Jun 26, 2019 11:36होमपेज › Kolhapur › वारीत होणार 20 हजार ताटांचे वाटप..!

वारीत होणार 20 हजार ताटांचे वाटप..!

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:02PMहमीदवाडा : मधुकर भोसले

गेल्या काही वर्षांपासून वारी अधिकाधिक सुसह्य होण्यासाठी तसेच वारीमध्ये अधिकाधिक स्वछता राखली जावी, यासाठी चोपदार फौंडेशन व अन्य सेवाभावी संस्था यांनी कृतिशील उपक्रम राबविले आहेत. यंदा ‘आम्ही वारकरी’ संस्थेच्या वतीने राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘पत्रावळीमुक्त वारी’ मोहीम हाती घेतली आहे. व त्या मोहिमेअंतर्गतच चालू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात लवकरच 20 हजार स्टील ताटे दिंड्यांना वितरित केली जाणार असून, याबाबत प्रबोधनही सुरू ठेवले आहे.

संतविचार विशेषतः तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेले संतविचार अभ्यासवर्ग, गप्पा संतांच्या असे उपक्रम राबवितानाच सरकारच्या प्लास्टिक बंदीला सकारात्मक घेत पत्रावळी मुक्त वारीचा हा उपक्रम हाती घेतला आहे. खरे तर चोपदार फाऊंडेशन व श्रीमंत दगडूशेठ व सिध्दिविनायक ट्रस्ट यांच्या वतीने वारीत गेल्या 4 वर्षात स्वछता अभियान राबविताना कचरा संकलनासाठी 3 लाख प्लास्टिक बॅगचे वाटप केले गेले होते व त्यास वारकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पण प्लास्टिक बंदीने हा उपक्रम थांबविण्यात आला. याच उपक्रमामध्ये सहभागी असणारे माऊलींचे वंश परंपरागत चोपदार राजाभाऊ व रामभाऊ रंधवे तसेच संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार व एकूणच ‘आम्ही वारकरी’चे सर्व सदस्य यांनी पत्रावळीमुक्त वारीचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला व त्यास युवराज ढमाले ग्रुप, इन्व्हार्नमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती यांनी प्रतिसाद देत तब्बल वीस हजार स्टील ताटे उपलब्ध करून दिली आहेत. दोन टप्प्यांमध्ये ही ताटे वितरित केली जातील. पुढील वर्षीपासून प्रत्येक वारकर्‍याने वारीस  येताना जरी आपले ताट सोबत आणले तरी वारी 100 टक्के पत्रावळी मुक्त होण्यास मदत होणार आहे म्हणून त्यासाठी देखील दिंड्यांमध्ये  जाणीवपूर्वक प्रबोधन सुरू आहे.

70 दिंड्यांचा प्रतिसाद...

पत्रावळीमुक्त वारीचे प्रबोधन करताना ‘आम्ही वारकरी’च्या वतीने दिंड्यांनी भोजन व नाष्ट्यासाठी आपापल्या पातळीवरदेखील ताटे उपलब्ध करावीत, असे आवाहन केले आहे. त्यास नोंदणीकृत 240 पैकी 70 दिंड्यांनी प्रतिसाद दिला असून, या दिंड्यांनीही ताटे खरेदी सुरू केल्याचे रामभाऊ चोपदार यांनी सांगितले.