Thu, Jun 27, 2019 00:20होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’चे कर्मचारी तटस्थ राहणार का?

‘गोकुळ’चे कर्मचारी तटस्थ राहणार का?

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 11 2017 11:50PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

गोकुळ कर्मचारी संघटनांनी येथून पुढे संघाच्या राजकारणात न पडण्याचा निर्णय पन्हाळा येथील बैठकीत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत संघटना पदाधिकारी व कर्मचारी यांमध्येच मतभेद असल्याचे उघड झाले आहे. मोर्चात भाषण ठोकणार्‍या पदाधिकार्‍यांनीच या बैठकीकडे पाठ फिरवल्याने संघटनांना तटस्थ राहण्याचा निर्णय किती दिवस टिकणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

गोकुळमध्ये सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना सुरू झाला आहे. गायीच्या दूध दरात वाढ करावी, यासाठी विरोधी गटाने मोर्चा काढला, तर विरोधकांनी काढलेल्या मोर्चाचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी गटाने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भाषणे ठोकली. विरोधकांनी संघावर काढलेल्या मोर्चाचा या संघटना पदाधिकार्‍यांनी समाचार घेतला. विरोधकांच्या मोर्चात सुपरवायझरांच्या उद्योगावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. दूध उत्पादक, संघाच्या हिताचे काम न करता सुपरवायझर राजकीय माहिती गोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी सुपरवायझरना सज्जड दमही दिला होता. यावरून कर्मचार्‍यांत धुसफूस सुरू होती.

सत्ताधारी गटाने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मोर्चाचे नियोजन गोकुळ कर्मचार्‍यांवर सोपवण्याबाबत चर्चा  झाली होती. मात्र, काही कर्मचार्‍यांनी व संघटना पदाधिकार्‍यांनी त्यास नकार दिला होता. मात्र, नेत्यांच्या जवळ असणार्‍या सुपरवायझरनी या मोर्चास कंबर कसली. त्यावरून कर्मचार्‍यातही दोन गट निर्माण झाले. शेतकर्‍यांच्या बाजूने उतरायचे की विरोधात, असाच पेच निर्माण झाला होता. संघात नेत्यांच्या आशीर्वादाने नोकरी मिळाल्यामुळे नेत्यांचा शब्द झेलणार्‍यांची संख्या अधिक असल्याने विरोध करणार्‍या कर्मचार्‍यांना गप्प बसावे लागले. मोर्चानंतर मात्र कर्मचार्‍यात मंथन सुरू झाले आहे. त्यातूनच गोकुळच्या राजकारणात सहभागी न होण्याचा विचार पुढे आला आहे.