Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Kolhapur › गणेशोत्सवात डॉल्बीचा दणादणाट होणार?

गणेशोत्सवात डॉल्बीचा दणादणाट होणार?

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 11:53PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

गणेशोत्सव तोंडावर आल्याने तरुण मंडळांची हा उत्सव जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. गणेशमूर्ती कशी असावी, स्टेज डेकोरेशन, उत्सव काळात महाप्रसाद, सजीव तांत्रिक देखावे अशा सर्व बाबींवर चर्चा सुरू आहे; पण ही चर्चा एकाच नियोजनावर येऊन थांबत आहे, ती म्हणजे डॉल्बीवर. मिवणुकीत डॉल्बी लावायचा काय की नाही, याबाबत आजही तरुण मंडळांच्या कार्यकत्यार्र्ंमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. ऐन सणासुदीच्या काळात डॉल्बीवर निर्णय घेण्यापेक्षा आतापासून पोलिस प्रशसनाने आपली भूमिका तरुण मंडळांना सांगणे गरजेचे आहे, जेणेकरून उत्सव काळातील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव काळात डॉल्बी असावा की नसावा, याबाबत अनेक वाद झाले आहेत. 2010 सालापासून पोलिसांनी उत्सव काळात डॉल्बी लावण्याला विरोध केला. तेव्हा त्याला राजकीय वळण मिळाले. अनेक राजकीय नेते मंडळींनी डॉल्बी लावलीच पाहिजे, अशी भूमिका घेऊन तरुण मंडळांना पाठबळ दिले. पोलिस प्रशासनाने 60 ते 90 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा ठेवली. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास पोलिसांनी तेव्हा कारवाईचा इशाराही दिला होता. काही मंडळांनी आवाजाचे प्रदूषण नको, हे मान्य करून पारंपरिक वाद्यांना पसंती दिली.तर, काहींनी डॉल्बीचा अट्टहास काही सोडला नाही. त्यामुळे मिरवणुकीत डॉल्बी घुमलाच. 

काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांची डेसिबल मोजून बघा, अशीही मागणी केली, तेव्हा पारंपरिक वाद्यांचा डेसिबल हा जास्त असल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही तज्ज्ञांनी डॉल्बीच्या आवाजाचा सामान्य नागरिकांच्या कान तसेच हृदयावर परिणाम होतो, तसा पारंपरिक वाद्यांचा होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. अन्य धर्मांचे सण साजरे होताना त्यांना डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग आमच्या सणांवर डॉल्बी बंदी का, अशी भूमिकाही काही मंडळांनी मांडली. गतवर्षी राजारामपुरीत मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावलेल्या मंडळांना शहर डीवायएसपी डॉ.प्रशांत अृमतकर यांनी मुख्य  मिरवणुकीत प्रवेश नाकारला. यावरून तरुण मंडळे व पोलिस प्रशासनामध्ये बाचाबाची झाली. मध्यरात्रीपर्यंत या मिरवणुका खोळंबल्या होत्या. डॉल्बी तसेच अन्य लेसर शोवर मंडळांनी लाखो रुपयांचा खर्च केला होता. काही मंडळांनी रस्त्यावरच आपली ट्रॅक्टर ट्रॉली लावून ठेवल्या होत्या.  यावर तोडगा निघालाच नाही. दुसर्‍या दिवशी मंडळांना डॉल्बीशिवाय मूर्तींची प्रतिष्ठापना करावी लागली.
त्यामुळे डॉल्बीबाबत तरुण मंडळांमध्ये आतापासूनच प्रबोधन करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांना ज्येष्ठ सदस्यांनी समजावणे गरजेचे आहे. डॉल्बी नकोच हा संदेश या पुरोगामी कोल्हापूरमधून संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी पोलिस प्रशासनाने तरुण मंडळाशी चर्चा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्यास   येणारा गणेशोत्सव सर्वांसाठी मंगलदायी जाईल, यात शंकाच नाही.

तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे....
डॉल्बीला बंदी असतानाही कार्यकर्त्यांच्या हट्टापायी डॉल्बी लावण्यात आली; पण पोलिसांनी मिरवणसकीत अशा मंडळांच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांंवर गुन्हे दाखल केले. पोलिस स्टेशन व कोर्टाच्या आजही हे कार्यकर्ते चकरा मारत आहेत.  डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरून गायब होणारे कार्यकर्ते वेगळे व गुन्हे दाखल करून घेणारे कार्यकर्ते वेगळे. या गुन्ह्यांमुळे अनेकांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. त्यामुळे यंदा डॉल्बी वाजवायची की नाही, याबाबत मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

आतापासूनच डॉल्बीबाबत नियोजन गरजेचे......... 
गणेशोत्सवाला अजून अवधी असला, तरी तरुण मंडळांकडून उत्सासाठीची तयारी सुरू आहे. गणेशोत्सवात मुख्य विषय असणार आहे, तो डॉल्बीचा. तरुण मंडळे मिरवणुकीची परवानगी मागायला गेल्यानंतर पोलिसांकडून डॉल्बी लावणार असाल तर परवानगी नाही, असे सांगितले जाते. तरुण मंडळ डॉल्बीचे बुकिंग करूनच मिरवणुकीसाठीची परवानगी मागायला जातात. आता दोन टॉप दोन बेस हा नियम केला आहे; पण या दोन टॉप दोन बेसमधून धडकी भरवणारा आवाज येत असल्याने नेमके करायचे काय, असा प्रश्‍न पोलिस प्रशासनासमोर आहे.