Mon, May 20, 2019 21:09होमपेज › Kolhapur › वन्यप्राण्यांमुळे जगणे झाले मुश्कील

वन्यप्राण्यांमुळे जगणे झाले मुश्कील

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:45AM

बुकमार्क करा
आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

मार्च 2012 ला चंदगड तालुक्यातून कान्हूरमार्गे आजरा तालुक्यातील सुळेरान, हाळोली, मसोली या भागात आगमन केलेल्या हत्तींकडून गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले नुकसानीचे सत्र आजही कायम असून, वन खात्यासह लोकप्रतिनिधी व शासनाकडून ठोस उपाययोजनेचे निव्वळ गाजरच दाखवले जात असल्याने शेतकरीवर्ग मात्र पीक नुकसानीने त्रस्त झाला आहे. शासनाची उदासीनता शेतकर्‍यांच्या पिकाबरोबरच आर्थिक गणिते विस्कटून टाकत आहे. हत्ती, गव्यांसह वन्यप्राण्यांकडून सुरू असलेल्या नुकसानीचा बंदोबस्त होणार तरी कधी? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

सुरुवातीला तालुक्याच्या पश्‍चिम भागात असणारा हत्तींचा वावर आता संपूर्ण तालुकाभर सुरू झाला आहे. अगदी आजरा शहरदेखील याला अपवाद राहिलेले नाही. वझरे, पेरणोली, साळगाव, कोरिवडे, हरपवडे, देवकांडगाव, किटवडे, सुळेरान, घाटकरवाडी, मसोली, हाळोली, वेळवट्टी, देवर्डे, गवसे, आल्याचीवाडी, दर्डेवाडी, का. कांडगाव, परोली, मुरुडे, चितळे यासह तालुक्याच्या विविध भागांमध्ये हत्तींचा वावर सुरू आहे. मध्यंतरी हेच हत्ती पेरणोलीमार्गे खेडे, हाजगोळी, सोहाळे भागातील ऊस, काजू, नारळ, मेसकाठी, भात, केळी आदी पिकांचे नुकसान करून पुन्हा पश्‍चिम भागाकडे वळले आहेत. एकीकडे हत्तींचा धुमाकूळ, तर दुसरीकडे गव्यांची वाढणारी प्रचंड संख्या, यामुळे शेतकरीवर्गाला शेती करणेही अडचणीचे झाले आहे. सुदैवाने हत्ती व गव्यांकडून जीवितहानी झाल्याची घटना घडली नसली, तरीही अनेकजण जखमी मात्र झाले आहेत.

तालुक्याच्या पश्‍चिम भागात असणार्‍या किटवडे, आंबाडे या भागामध्ये बिबट्यासारख्या प्राण्याने उच्छाद मांडला असून, शेळी, वासरे यासारख्या पाळीव जनावरांना त्याने लक्ष्य बनवले आहे. सुरुवातीला हे वन्यप्राणी म्हणजे तालुक्यात असणार्‍या संपन्न निसर्गाचे व जैवविविधतेचे प्रतीक म्हणून कौतुकाने पाहिले जात होते; पण प्रत्यक्षात येत असणार्‍या अनुभवामुळे आता मात्र ते त्रासदायक ठरू लागले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे जसे शेतकर्‍यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. तीच अवस्था वन विभागाच्या कर्मचार्‍यांचीही आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्याकरिता वन खात्याकडे एक मोबाईल व्हॅन वगळता पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे केवळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे एवढेच वन कर्मचार्‍यांच्या हातामध्ये राहिले आहे. 

वेळोवेळी हत्ती नुकसानग्रस्त भागामध्ये ‘एलिफंट गो बॅक’ यासारखी स्थानिक शेतकर्‍यांच्या मदतीने मोहीम राबविली जात आहे. परंतु, तीही कुचकामी ठरत आहे. दररोजच्या नुकसानीचे पंचनामे करणे वेळीच शक्य होत नसल्याने वन विभागाचे कर्मचारी शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जाताना दिसत आहेत.