Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Kolhapur › गोकुळ संचालक मंडळ अपात्र का ठरवू नये?

गोकुळ संचालक मंडळ अपात्र का ठरवू नये?

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने (गोकुळ) दूध दरात वाढ न केल्याबद्दल अध्यक्षांसह संचालकांना अपात्र का ठरवू नये, अशा आशयाच्या नोटिसा विभागीय उपनिबंधक सुनसल शिरापूरकर यांनी गोकुळच्या सर्व संचालकांना पाठवल्या आहेत. दरम्यान, शासनाच्या निर्णयाच्या विरोधात दूध संघाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याला यापूर्वी स्टे घेतला असल्याचे गोकुळच्या वतीने सांगण्यात आले. 
शासनाने गाय दुधास 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर 23 वरून 27  रुपये आणि म्हैस दुधास 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ गुणप्रतीच्या म्हैस दूध खरेदी दरात 33 रुपयांवरून 36 रुपये करण्यात आला आहे. तसेच 6.1 ते 7.5 पर्यंत प्रतिपॉईंट वाढीव फॅटसाठी 30 पैसे वाढ कायम ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात 19 जून 2017 रोजी आदेश काढले आहेत.

या दूध दरवाढीप्रमाणे संघाने उत्पादकांना दर देणे आवश्यक होते; पण संघाने पुढील उचित कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सहकार कायदा कलम 79 (अ) (ब) अन्वये संचालक मंडळास नोटिसा पाठवल्या आहेत. यासंंदर्भात संचालक मंडळाला 2 मेपर्यंत विभागीय उपनिबंधक कार्यालय पुणे यांच्याकडे खुलासा करावा, असे आदेश दिले आहेत. राज्यातील एकूण 17 दूध संघांच्या संचालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,  यापूर्वी शासनाने अशीच नोटीस काढली होती. त्यावेळी म्हैस दूध दरवाढ केली आहे; पण गाय दुधास मागणी कमी असल्याने 25 रुपयांवर दर देता येत नाही. म्हणून संघाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शासनाच्या निर्णयास स्टे घेतला आहे, तरीही पुन्हा शासनाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

Tags : Kolhapur, Why, should, Gokul, Board, Director, ineligible