Sun, Jun 16, 2019 02:09होमपेज › Kolhapur › त्या’ संघटनांवर बंदी का नाही? : डॉ. एन. डी. पाटील

त्या’ संघटनांवर बंदी का नाही? : डॉ. एन. डी. पाटील

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सामाजिक गैरकृत्य करणार्‍या संघटनांवर बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत सरकार कोणतीच कृती करत नाही. अशा संघटनांवर अद्याप बंदी का घातली नाही, असा सवाल करत या संघटनांना धडा शिकवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सरकारला केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धरणे धरत ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले.

‘फुले - शाहू - आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘आम्ही सारे पानसरे’, ‘संविधानाचा विजय असो’, ‘दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना अटक झालीच पाहिजे, खर्‍या सूत्रधारालाही अटक झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली.  डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाली. त्यानंतर दीड वर्षांनी कॉ.पानसरे यांची हत्या झाली. माझ्या या सहकार्‍यांचे खुनी सापडत नाहीत हे खूपच दु:खदायक आहे. या प्रकरणातील संशयित पकडावेत, अशी सरकारचीच राजकीय इच्छाशक्‍ती नाही.  तपासात समाधान वाटावे असे कोणतेही पाऊल तपास यंत्रणेकडून पडलेले नाही, जी प्रगतीची पावले पडली ती शेजारच्या कर्नाटक, गोवा राज्याकडून पडली आहे. राज्य शासन या प्रकरणी तपासात सातत्य ठेवत नाही. पाच तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. कर्नाटक, गोवा ही राज्ये तपासात महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर आहेत. ज्या संघटना गैरकृत्य करत आहेत, त्यांच्यावर आम्ही बंदीची मागणी केली आहे, त्या संघटनांना आता सरकारने धडा शिकवावा.

प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले, पाच वर्षे आंदोलन सुरू आहे. मात्र, साधा खडा देखील आम्ही उचललेला नाही. संयमाने, संविधानाचा आदर ठेवून हे आंदोलन करत आहोत. कॉ. दिलीप पवार म्हणाले, आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करत  आहोत. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील संशयित एटीएसला मिळाला आहे, पण ते त्यांचे यश नाही. व्यंकापा भोसले यांनीही भूमिका मांडली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुभेदार यांना देण्यात आले.आंदोलनात बी. एल. बरगे, रमेश वडणगेकर, भारत लाटकर, सीमा पाटील, बाबा ढेरे, कृष्णात स्वाती, स्नेहल कांबळे, सीमा पाटील, अरुण पाटील, नियाज अत्तार सहभागी झाले होते.