होमपेज › Kolhapur › ब्लॉग : महाडिक, मंडलिक की मुश्रीफ

ब्लॉग : महाडिक, मंडलिक की मुश्रीफ

Published On: Feb 10 2018 5:06PM | Last Updated: Feb 10 2018 5:06PMकोल्हापूर : रणधीर पाटील

2014 च्या मोदी लाटेतही निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.धनंजय महाडिक यांची भाजपशीच वाढलेली सलगी, लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा स्वत:ला आणि भाजपलाही अनुकूल, अशी घेतलेली राजकीय भूमिका...त्यातून विधानसभेसह काही नगरपालिका, जिल्हा परिषदेसारख्या राष्ट्रवादीच्याच सत्तास्थानांना दिलेले हादरे...आदी आदी कारणांमुळे खा. धनंजय महाडिक आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आतापर्यंत ‘राजकीय ट्यूनिंग’ जमू शकलेले नाही. त्यातूनच आता ऐनवेळी पक्षाने आदेश दिल्यास आपल्यालाच लोकसभा मैदानात उतरावे लागेल, असे सांगत आ. हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकला आहे.राष्ट्रवादी  ‘थ्री एम’ (महाडिक, मंडलिक, आणि मुश्रीफ) मध्ये कोणाला संधी देणार हे पहावे लागणार आहे. 

वर्चस्ववादामुळे राष्ट्रवादीची पिछेहाट

महानगरपालिका, जिल्हा परिषद, दोन्ही लोकसभा मतदार संघ, चार ते पाच विधानसभा मतदारसंघ, नगरपालिका, बाजार समित्यांवर एकेकाळी निर्विवाद वर्चस्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या पाच वर्षात प्रचंड पिछेहाट झाली आहे. पक्षांतर्गत वर्चस्ववाद आणि आता थेट मुश्रीफ-महाडिक यांच्यातील सुप्‍त संघर्ष याचा  पुरेपूर फायदा उठवत भाजपने काही सत्तास्थानांवर कब्जा केला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला आ. मुश्रीफ आणि आ. संध्यादेवी कुपेकर असे दोनच आमदार आहेत. बाजार समितीमध्ये काँग्रेस व शेकापच्या मदतीने सत्ता  आहे. इचलकरंजी लोकसभा मतदार संघात तर राष्ट्रवादीची स्थिती अत्यंत बिकट आहे. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या रूपाने शिरोळ तालुक्यात काही प्रमाणात  राष्ट्रवादी टिकून आहे. 

भाजपकडून खा. महाडिक यांना गळ!

जिल्ह्यात भाजपचे जे काही बस्तान बसले आहे, त्यामध्ये महाडिक गटाचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतींपर्यंत ठिकठिकाणी महाडिक गटाची रसद मिळाल्याने भाजप सत्तेपर्यंत पोहचला आणि बघता बघता जिल्ह्यातील प्रस्थापीत पक्ष म्हणून पुढे आला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. महाडिक यांच्या स्नुषा शौमिका अमल महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. 

शौमिका महाडिक या जर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार नसत्या तर भाजपची जिल्हा परिषदेवर सत्ता येणे राजकीयदृष्ट्या अशक्य होते, पण  महाडिक गटाच्या राजकीय ताकदीचा आधार घेत भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकाविला. महाडिक गटाची जिल्ह्यातील राजकीय ताकद ओळखूनच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही खा. महाडिक यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. इतकेच नव्हे तर महाडिक 2019 ला भाजपकडून लढल्यास केंद्रात ते मंत्री होतील, असेही जाहीर करून टाकले आहे.  

लोकसभेसाठी आतापासून मशागत 

खासदार महाडिक यांची भाजपशी जवळीक वाढल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. महाडिक यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या राजकीय कक्षा रुंदावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा महाडीक गट म्हणूनच वाटचाल सुरू ठेवली.  बेरजेच्या राजकारणात महाडीक यांनी  ताराराणी आघाडीचा आधार घेतला. खासदार महाडिक यांची पक्षाशी समांतर वाटचाल लक्षात आल्याने राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते त्यांच्यापासून हळूहळू दुरावले. 

महाडिक व राष्ट्रवादीमध्ये जी दरी निर्माण झाली ती भाजप नेत्यांनी सलगी करत भरून काढली. कागल तालुक्यातील एका कार्यक्रमात खा. महाडिक यांनी भाजपकडून मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभेसाठी मैदानात उतरलेल्या समरजीतसिंह घाटगे यांना ‘विजयी भव:’ असा दिलेला मंत्र बरचं काही सांगून जातोय.  मुश्रीफ आणि महाडिक यांच्यातील वाढलेल्या दरीच्या पार्श्‍वभूमीवरच ‘पुढचा खासदार मीच असेन, पण पक्ष त्यांनी ठरवावा’, असा गर्भित इशारा खा. महाडिक यांनी मुश्रीफांना दिला. दुसरीकडे मुश्रीफ यांनीही महाडीक यांना पर्याय म्हणून प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी पुढे आणली आहे. स्व. सादाशिवराव मंडलिक यांचे प्रा. मंडलिक यांना खासदार करण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे भावनिक आवाहन कागलमधील ठिकठिकाणच्या जाहीर कार्यक्रमात ते करीत आहेत. 

...म्हणून  ऐनवेळी मुश्रीफ स्वत: मैदानात 

आ. मुश्रीफ यांना खासदार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असले तरी प्रा. मंडलिक यांनी मात्र आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. राष्ट्रवादीकडून जर महाडिकच मैदानात उतरले तर आपली पंचाईत नको, अशी भूमिका त्यामागे असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रा. मंडलिक आतातरी आपण शिवसेनेकडूनच लोकसभा लढणार असल्याचे सांगत आहेत.लोकसभा निवडणूकीसाठी तिरंगी लढत झाल्यास आपण शिवसेनेकडूनही जिंकू, असा विश्‍वासही त्यामागे असू शकतो. त्यामुळेच निवडणूकीच्या तोंडावर ऐनवेळी तुल्यबळ उमेदवारच मिळाला नाही, तर पक्षाची पंचाईत नको म्हणून आता मुश्रीफ यांनी ‘आपल्यालाच लोकसभा मैदानात उतरावे लागेल’, असे स्पष्ट केले आहे.