Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Kolhapur › डेंग्यूची खरी माहिती दडवतेय कोण? 

डेंग्यूची खरी माहिती दडवतेय कोण? 

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 27 2018 11:57PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूचा मोठा फैलाव झाल्याचे चित्र आहे. कीटकजन्य आजारांमध्ये याविषयी उद्रेक जाहीर होणे आवश्यक आहे. डेंग्यूबाधित रुग्णांचा सहजी आढावा घेण्यासाठी काही मोठ्या रुग्णालयांत एक फेरफटका मारला, तर एकेका रुग्णालयाच्या पातळीवर या वर्षभरात डेंग्यूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचल्याची माहिती पुढे येते आहे. तथापि, शासकीय आकडेवारीत मात्र ऑगस्टअखेर डेंग्यूने केवळ तीनच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध आहे. यामुळे डेंग्यूच्या आजाराविषयी पारदर्शक माहितीचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, त्याची माहिती रुग्णालय वा शासन यंत्रणा यांच्याकडून लपविली  जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रामध्ये डेंग्यूमुळे निष्पापांचे बळी जाऊ लागल्यानंतर शासनाने सर्व खासगी रुग्णालयांना डेंग्यूबाधित  रुग्ण आढळल्यास त्याची तातडीने शासकीय यंत्रणेला माहिती देण्याचे कायद्याने बंधनकारक केले आहे. यानुसार खासगी रुग्णालयांनी माहिती देणे आवश्यक आहे. या माहितीआधारे संबंधित रुग्णाच्या निवासाभोवती सर्वेक्षण करून तेथील डेंग्यूचा उद्भव नष्ट करणे शक्य होते. परंतु, सध्या कोहापुरात डेंग्यू गल्लोगल्ली थैमान घालत असताना शासकीय दफ्तरात मात्र आकडेवारी अत्यंत त्रोटक दिसते आहे. डेंग्यूचे संकट रोखण्यासाठी नागरिकांचे योगदान 90 टक्क्यांहून अधिक असताना नागरिक ही जबाबदारी यथायोग्य पार पाडताना दिसत नाहीत, हे जितके सत्य आहे तितकेच 10 टक्क्यांची जबाबदारी असलेल्या शासन यंत्रणेतही याविषयी सावळागोंधळ आहे. 
डेंग्यूचे प्राथमिक निदान करण्यासाठी रक्‍त नमुन्याची चाचणी घेण्याकरिता एनएस 1 या प्रकारच्या किटस्ची गरज लागते. परंतु, शासकीय यंत्रणेत ही किटस्च उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे. शिवाय, डेंग्यूची बाधा निश्‍चित करण्यासाठी जी रक्‍ताची इलाईझा किटस्द्वारे (आयजीजी/आयजीएम) चाचणी केली जाते. त्या चाचणीचे केंद्र शासकीय यंत्रणेने शेंडापार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत हालविले आहे.

यामुळे मुळातच ही मोफत चाचणी कोठे केली जाते, याची नागरिकांना माहिती नाही आणि केंद्राची जागा आडवाटेवर नेऊन ठेवल्याने माहिती असणार्‍या रुग्णांनाही त्याचा लाभ घेता येत नाही. यामुळे या रक्‍त चाचणीवर खासगी लॅबमध्ये पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येते आहे. रुग्णांच्या कुटुंबीयांचा रिकामा होणारा खिसा हा प्रश्‍न तर त्याहून निराळा आहे..