Mon, Jun 24, 2019 21:09होमपेज › Kolhapur › पाच हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराला अटक

पाच हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराला अटक

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 13 2018 1:02AMराधानगरी / तुरंबे : प्रतिनिधी

राधानगरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक आप्पासो शिंदे याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शिंदे याने एका गुन्ह्याप्रकरणी हजेरीला यायला लावत नाही, असे सांगून 10 हजार रुपयांची मागणी केली होती. गुरुवारी सकाळी सापळा रचून पथकाने राधानगरी बसस्थानक परिसरात त्याला पकडले.

राधानगरी पोलिस ठाण्यात अशोक शिंदे सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रारदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास सहायक फौजदार आप्पासो शिंदे करत होता. या कामी न्यायालयाने तक्रारदाराला दर सोमवारी 10 ते 2 या वेळेत राधानगरी पोलिस ठाण्यात हजेरी देण्याची अट घालून अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यातील व्यक्‍तीला तुम्हाला हजेरीला यायला लावत नाही, यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. चर्चेतून हा व्यवहार पाच हजार रुपयांवर ठरला होता.

त्यानुसार तक्रारदार यांनी 11 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडे अशोक शिंदे याच्याविरोधात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी पथकाने राधानगरी पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. मात्र सहायक फौजदार शिंदे याने लाचेची रक्‍कम राधानगरी पोलिस ठाण्यात न स्वीकारता तक्रारदाराला एस. टी. स्टँड परिसरात बोलावून घेतले. यावेळी पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस नाईक आबासो गुंडनके, शरद पोरे यांच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

दरम्यान, ही माहिती वार्‍यासारखी पसरली आणि पोलिस ठाण्यासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली. ही कारवाई पोलिस उपायुक्‍त संदीप दिवाण, पोलिस अधीक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार गिरीश गोडे, शरद पोरे, नवनाथ कदम, कृष्णात पाटील यांनी केली.