Wed, Nov 21, 2018 22:03



होमपेज › Kolhapur › पाच हजारांची लाच घेताना ‘करवीर’चा हवालदार जेरबंद

पाच हजारांची लाच घेताना ‘करवीर’चा हवालदार जेरबंद

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:34AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

मारामारीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी 5000 रुपयांची लाच घेणार्‍या करवीर पोलिस ठाण्यातील हवालदार रंगराव भागोजी मनुगडे (वय 56, रा. सुर्वेनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. कळंबा रिंगरोडवर भरदुपारी ही कारवाई करण्यात आली.करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने सायंकाळी त्याच्या घराची झडती घेतली.पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, तक्रारदार आनंद गायकवाड (रा. उजळाईवाडी) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्या नातेवाईकांनी आपटेनगर येथील गट नं. 1034/1मध्ये प्लॉट क्रमांक 45 हा संजय कोळेकर यांच्याकडून खरेदी केला आहे. त्याचा नोटरी स्टॅम्पवर व्यवहार झाला आहे. तथापि, कोळेकरने नातेवाईकाची फसवणूक केल्याची गायकवाड यांची तक्रार आहे. सदरची जागा व्हेरोनिका डेव्हलपर्सचे संचालक बाबासाहेब वरोटेंच्या मालकीची होती. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. त्याचा निकालही कोळेकरविरुद्ध झालेला आहे.

तक्रारदाराच्या नातेवाईकांनी प्लॉटवर घर बांधले असून, शेजारी कोळेकरचे मित्र शिवाजी सुतार, जयवंत यादव यांचेही प्लॉट आहेत. काही दिवसांपूर्वी जागेच्या कारणातून तक्रारदाराचे सासरे व शिवाजी सुतार यांच्यात वादावादी झाली. त्याच्यात हाणामारीही झाली.सुतार यांनी तक्रारदार गायकवाड, त्यांची पत्नी, अन्य आठजणांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मनुगडे हा तपासाधिकारी होता. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने संशयिताकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

पाच हजारांवर सौदा

हवालदाराने बुधवारी सकाळी पुन्हा गायकवाडशी संपर्क साधला. पती, पत्नीला अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजारांवर सौदा ठरला. मनुगडे याने दुपारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून रोख रकमेसह त्यांना कळंबा रिंगरोड, सुर्वेनगर मूग जनरल स्टोअर्स दुकानासमोर येण्यास सांगितले.तक्रारदाराकडून रक्‍कम स्वीकारताच एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे व पथकाने सापळा रचून हवालदाराला रंगेहाथ पकडले. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असेही गोडे यांनी सांगितले.

लाचखोराविरुद्ध पुढे या!

लाचखोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून करण्यात आले आहे.