Wed, Apr 24, 2019 08:27होमपेज › Kolhapur › लाचेचे पैसे मुरतात कुठे?

लाचेचे पैसे मुरतात कुठे?

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:21AMकोल्हापूर : विजय पाटील 

लाचेच्या व्यवहारांची जर दररोजची कोणी मोजदाद केली तर एकूण रक्कम कोटींच्या कोटींची उड्डाणे अशा पद्धतीची  सहज होईल. कारण लाचेचे व्यवहार ही समांतर अर्थव्यवस्था बनली आहे. पण, दररोज तयार होणारा हा काळा पैसा मुरतोय कुठे? हा प्रश्‍न सर्वसामान्यांना नेहमीच पडलेला असतो. या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) विशेष टीम कार्यरत आहे. 
आपल्या ओळखीतला माणूस अचानक अलिशान वाहनात दिसतो. तोच माणूस फ्लॅट, प्लॉट, जमिनी आदी स्थावर मालमत्ताही वेगाने खरेदी करत सुटतो. आपल्याला माहिती असते की तसा हा माणूस जुजबी सोडलं तर काही कामधंदा करत नाही. मग ही डोळे दिपवणारी प्रगती झाली कशी?  असे विचार करायला लावणार्‍या माणसांचा मेहुणा किंवा जवळचा पाहुणा सरकारी खात्यात असण्याची शक्यता जास्त असते किंवा आपल्या त्या ओळखीच्या माणसाचा दोस्त कोणीतरी भ्रष्ट अधिकारी असू शकतो.  

तसं हे ओळखणं खूप सोपं असतं. कारण लाच घेणारे आपल्या नावावर कधीच संपत्ती करण्याच्या फंदात पडत नाहीत. आपल्या विश्‍वासातील नात्यांमध्ये किंवा मित्रमंडळींच्या नावावर हे पैसे जमा केले जात असल्याचे एसीबीच्या जाणकार अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. पूर्वी अशा बेनामी संपत्तीच्या गोष्टी खपत होत्या. कारण त्याचे पुरावे मिळणे अवघड असायचे. पण, आता तंत्रज्ञानामुळे असे पैसे दुसर्‍याच्या नावावर खपवणे दोघांच्याही दृष्टीने जेलची हवा ठरू शकते. कारण मोबाईलवरील संभाषण (सीडीआर)  कधीही उपलब्ध होते. सीसीटीव्हीमुळे बसण्या-उठण्याचे पुरावे सहज सापडू शकतात. जोपर्यंत लाच पचते तोपर्यंत कुणाचा काहीच प्रॉब्लेम नसतो. पण, हे फार काळ चालत नाही. कधी ना कधी हे उघडं पडतं. एकदा हे प्रकरण चव्हाट्यावर आलं की मग मात्र पैसे मुरवणारी सगळी साखळीच तुरुंगवारीत सापडू शकते, असा तपास यंत्रणेतील जाणकांराचा विश्‍वास आहे.