Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Kolhapur › शाळेत मराठी सक्‍तीची कधी होणार?

शाळेत मराठी सक्‍तीची कधी होणार?

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:22AMकोल्हापूर : विजय पाटील

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेतच. परंतु, राज्य सरकारने सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांत पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत मराठी भाषा विषय हा सक्‍तीचा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कर्नाटकात कन्‍नड भाषा दहावीपर्यंत सक्‍तीची करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्यातही स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यात बोलली जाणारी मराठी भाषेची सक्‍ती तत्काळ करावी, यासाठी सोशल मीडियावरूनही जोरात मोहीम सुरू आहे.

बारा कोटी लोकसंख्या असणार्‍या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. गोवा राज्यात मराठी सध्या सहभाषा आहे; पण ती राजभाषा व्हावी म्हणून संघर्ष सुरू आहे. बहुतांश मराठी भाषा बोलतात. यासह कर्नाटकातील सीमाभागातील जवळपास चाळीस लाख लोक मराठी बोलतात. बंगळूरमध्येही मराठी बोलणार्‍यांची संख्या मोठी आहे. ग्वाल्हेर, इंदौर, तंजावर, देवास (मध्य प्रदेश), बडोदा (गुजरात) या मराठी संस्थानाचा प्रदेश असणार्‍या ठिकाणीही मराठी बोलणार्‍यांची संख्या अजूनही चांगली आहे. सोन्याची गलई काढण्यासाठी पश्‍चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांत स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. हरियाणा राज्यात पानिपत, सोनपत या परिसरातील रोड मराठा ही मंडळीसुद्धा आता मराठी भाषा शिकत आहेत. मराठी भाषिकांचा देशभरातील मराठी भाषिकांशी रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने मराठी बोली ही अनेक ठिकाणी प्रस्थापित झाली आहे.

मान्यवरांची आग्रही भूमिका

मराठी सक्‍तीची करा म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ठोस भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही मराठी भाषा सक्‍तीबाबत आग्रह व्यक्‍त केला आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी तर मराठी भाषा ही सक्‍तीचीच हवी, अशी टोकाची मागणी असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक साहित्य संमेलनात हा विषय ऐरणीवर असतो.

भाषाविषयक समितीची शिफारस

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय  सक्‍तीचा करण्याची शिफारस मराठी भाषाविषयक समितीने तीन वर्षांपूर्वी केली आहे. तसेच मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचीही सूचनाही या सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे.

जगभरात मराठीचा ‘डंका’

जगभरात नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेल्या मंडळींच्या दुसर्‍या-तिसर्‍या पिढीनेही मराठी भाषा जपली आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली असो किंवा लंडन असो, या ठिकाणी मराठी माणसांच्या संस्था कार्यरत आहेत. आता तर जर्मनी, रशिया या देशांतही मराठी माणसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटवर्क उभे केले आहे. मॉरिशसमध्ये मराठी माणसांची संख्या थक्‍क करणारी आहे. दुबईमध्येही कामानिमित्त स्थायिक झालेली मराठी माणसे वाढत आहेत. मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या नऊ कोटी अशी मानली जाते. मात्र, प्रत्यक्षात बारा कोटींहून अधिक मराठी बोलतात आणि पंधरा कोटींहून अधिक लोकांना मराठी भाषा समजते, असा निष्कर्ष नुकताच एका खासगी संस्थेने काढला होता.