Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Kolhapur › दहा खुनांचा उलगडा होणार तरी कधी? 

दहा खुनांचा उलगडा होणार तरी कधी? 

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 11:58PMकोल्हापूर : गौरव डोंगरे

मागील तीन वर्षांत घडलेल्या खुनांच्या घटनांतील दहा खुनांचा उलगडा पोलिसांना अद्याप होऊ शकलेला नाही. 2016 मधील सहा खुनांची सहा महिन्यांतील 3 खुनांची उकल झालेली नाही. रुकडीतील डॉ. कुलकर्णी दाम्पत्याचा दुहेरी खून, टोपनजीक सापडलेला महिलेचा मृतदेह, शिवाजी पेठेत फिरस्त्याचा गोळ्या झाडून झालेला खून यासह कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनातील आरोपी शोधण्याचे आव्हान कोल्हापूर पोलिस दलासमोर आहे.

उघडकीस न आलेली खून प्रकरणे

रुकडीतील डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याचा घरात घुसून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेत प्राथमिक तपासात चोरीचा उद्देश दिसून येत नसल्याने खुनाचे नेमके कारण आणि खुनी आजही पोलिसांना मिळालेले नाहीत. टोपनजीक फेकण्यात आलेला महिलेचा मृतदेह, गिरोली घाटात मिळालेला तरुणाचा मृतदेह, शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात फिरस्त्याच्या डोक्यात गोळ्या घालून करण्यात आलेला खून, यंदाच्या वर्षातील फेबु्रवारीतील शहापूर येथील ओमप्रकाश पागे, मार्च महिन्यातील उसतोड मजूर स्वप्निल खोडे याचा गळा आवळून करण्यात आलेला खून व एप्रिलमधील कोडोलीत घडलेला वाहीद पठाण याचा खून अशा खुनांनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. 

मारहाणीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे. वर्चस्ववादातून लक्षतीर्थ वसाहत, राजेंद्रनगर, साळुंखे पार्क, बिंदू चौक, यादवनगरात वारंवार हाणामारीच्या घटना घडत आहेत. सहा महिन्यांत खुनाच्या प्रयत्नाचे 57 गुन्हे दाखल झाले असून, यातील बहुतांश तरुणांतील वर्चस्ववादातून झालेल्या घटनांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांत 210 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेत जमिनीचा वाद, जागेचा वाद यातून भाऊबंदकीत होणार्‍या हाणामार्‍यांचे प्रमाण पन्हाळा, शाहूवाडी आणि करवीर तालुक्यांत मोठे आहे. 2016 मधील 62 खुनाच्या प्रयत्नांचे असलेले प्रमाण 2017 मध्ये 99 पर्यंत वाढले होते. मागील पाच महिन्यांत  खुनाच्या प्रयत्नाचे 57 गुन्हे दाखल झाले आहेत. 

अपघाताचा बनाव

6 मार्चला कागल तालुक्यातील म्हाकवे येथे स्वप्निल खोडे या उसतोड मजुराचा खून झाला. ट्रॅक्टरवरून पडल्याने त्याला दोरीचा फास लागल्याचा बनाव करण्यात आला होता. पण, वैद्यकीय अहवालात  गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. या खुनाचा उलगडा अद्याप झालेला नाही. 

शस्त्र तस्करीचे केंद्र

कोल्हापूरसह इचलकरंजी, जयसिंगपूर या परिसरात शस्त्र तस्करीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत कारवाया झाल्या आहेत. नुकत्याच पाचगावातील तरुणाच्या गोळ्या झाडून झालेल्या खुनानंतर संशयित आरोपी प्रतीक पोवारकडून 2 पिस्तूल व 1 रिव्हॉल्वर जप्‍त करण्यात आले. ही शस्त्रे त्याने मध्य प्रदेशमधून आणल्याची कबुली दिली आहे. इचलकरंजीतील काही टोळ्यांकडेही परप्रांतातून आणलेली गावठी बनावटीची हत्यारे मोठ्या प्रमाणात मिळून आली आहेत.