Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Kolhapur › आश्‍वासनांची पूर्तता कधी होणार?

आश्‍वासनांची पूर्तता कधी होणार?

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 11:44PMमुदाळतिट्टा : प्रा. शाम पाटील

कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे कबड्डी आणि मुरगूड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे मैदान झाले. या स्पर्धांच्या उद्घाटन आणि पारितोषिक वितरणासाठी जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी झाली. यावेळी अनेक घोषणा झाल्या आणि आश्‍वासनेही नेत्यांनी भाषणांतून दिली. या घोषणांची आणि आश्‍वासनांची पूर्तता कधी होणार, घोषित केलेली मानाची पदे केव्हा मिळणार, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.

मिशन विधानसभा 2019’चे वारे कागल तालुक्यात जोरात वाहायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून कार्यकर्ते चार्ज करण्यावर नेतेमंडळींनी भर दिला आहे. पदाधिकार्‍यांच्या जुन्या नव्या निवडी जाहीर होत आहेत. गाववार शाखा उभारणी, उद्घाटन असे कार्यक्रम होत आहेत. यातून डिजिटल पोस्टर वॉर सुरू झाले आहे. यातून  विधानसभा 2019 चे संकेत जनतेसमोर येत आहेत. म्हाई, यात्रा जोमात आहेत आणि कार्यकर्त्यांच्या पंक्तीत बसून जेवण घेणारी नेतेमंडळी दिसत आहेत.

यातच तालुक्यात खेळांची मैदानेही राजकीय कोट्यामुळे चांगलीच रंगून गेली आहेत. मुरगूड येथे ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कुस्तीचे मैदान चांगलेच गाजले. या कुस्तीच्या आखाड्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरणप्रसंगी पालकमंत्री चद्रकांत पाटील यांनी भव्यदिव्य कुस्तीचे आयोजन पाहून आपल्या भाषणात ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील यांना आपण ‘बिद्री’त न्याय देऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत लवकरच त्यांना मानाचे पद देऊ असे घोषीत केले. कोणते पद दिले जाणार यांची घोषणा मात्र पालकमंत्री पाटील यांनी केली नाही. त्यामुळे त्यांनी घोषित केलेले मानाचे कोणते पद रणजितसिंह पाटील यांना केव्हा मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

शिंदेवाडी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेवेळी पालकमंत्री  पाटील यांनी या स्पर्धेचे संयोजक दत्तात्रय खराडे यांना लवकरच ‘बिद्री’चे स्वीकृत संचालकपद देऊ, अशीही घोषणा केली. महिन्याचा कालावधी लोटला, तरी अजून या पदाबाबत काहीच निर्यण नाही. यामुळे दत्तामामाप्रेमी कार्यकर्तेही याबाबत चर्चा करीत आहेत. रणजितसिंह पाटील व दत्तामामा खराडे यांना पालकमंत्री ना. चद्रकांत पाटील यांनी घोषित केलेली पदे केव्हा मिळणार, याची कार्यकर्ते प्रतीक्षा करीत आहेत.

मुरगुडचे माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे संचालक प्रविणसिंह पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासह एका बैठकीच्या निमित्ताने आमदार हसन मुश्रीफ यांची कागल येथे भेट घेतली आहे. या भेटीत मुरगुडच्या विकासकामासंदर्भात चर्चा झाली असे कार्यकर्ते सांगत असले तरी अद्यापही प्रविणसिंह पाटील यांनी या बैठकीत काय चर्चा झाली हे स्पष्ट केलेले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आमदार मुश्रीफ यांच्याबरोबर राहणार हे निश्‍चित आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून प्रविणसिंह पाटील यांनी चांगले काम केले आहे आणि भविष्यात कागल तालुक्यातील  काँग्रेसची धूरा ते आपल्या खांद्यावर घेतील असा कयास आहे.