Mon, May 20, 2019 22:03होमपेज › Kolhapur › फेरीवाल्यांना व्यवसायाची सुरक्षितता मिळणार कधी?

फेरीवाल्यांना व्यवसायाची सुरक्षितता मिळणार कधी?

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:29AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

नोकरी मिळत नाही, मोठा व्यवसाय करायला भांडवल नाही, हातगाड्यांवरचा व्यवसाय करून दोनवेळचे पोट भरायचे, तर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कधी कारवाई करतील, याचा नेम नाही. त्यामुळे या व्यवसायला सुरक्षितता मिळावी व व्यवसायाचे निश्‍चित ठिकाण मिळावे, यासाठी  2014 मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण कायदा अस्तित्वात आला. पण, या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महापालिका प्रशासनाची चालढकल सुरू आहे. कायद्याची अंमलबजावणी केल्यास फेरीवाल्यांना सन्मानाने व्यवसाय करता येणार आहे. पण, त्यासाठी  पालिका प्रशासनाचा अडथळा कशासाठी, असा संतप्त सवाल फेरीवला संघटनांमधून  उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून वाढते शहरीकरण व त्याबरोबरच रस्त्यावरील फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. कोणीही उठतो, मी अमूक नगरसेवकाचा कार्यकर्ता आहे, कोणी आमदार तर कोणी खासदारांचा कार्यकर्ता असल्याचे सांगून रस्त्यात कोठेही हातगाडा टाकून व्यवसाय करत असल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे. कोणी बायोमेट्रिक कार्ड असल्याचे सांगून नियमाप्रमाणे  व्यवसाय करतो. तर, कोणी फाळकूटगिरी करणार्‍यांना हप्ते देऊन व्यवसाय करत असतो. त्यामुळे शहरात अस्ताव्यस्तपणे फेरीवाल्यांचा विस्तार झाला आहे. त्यांना कोणीही रोखूू शकत नाही, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होत आहे. भवानी मंडप, बिंदू चौक,  महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर परिसर या ठिकाणी फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे.

कधीतरी पालिका प्रशसनाला अतिक्रमण जास्त प्रमाणात झाले आहे असे वाटले तर तत्काळ फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढून टाकण्यासाठीची कारवाई सुरू होते. 
यात नियमाप्रमाणे व्यवसाय करणारे फेरीवालेही भरडले जातात. त्यामुळे या सर्वांना हक्काची जागा मिळण्याबरोबरच अतिक्रमणाच्या कारवाईपासून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी  राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.