Mon, Jun 17, 2019 18:51होमपेज › Kolhapur › गटातटातून शिवसैनिक कधी बाहेर पडणार

गटातटातून शिवसैनिक कधी बाहेर पडणार

Published On: Aug 18 2018 1:21AM | Last Updated: Aug 18 2018 1:08AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव, पक्ष मोठा असला तरी गटातटाचे कुरघोडीचे राजकारण, कार्यकर्त्यांची गटानुसार झालेली विभागणी, आंदोलनातही गटबाजीची झलक शिवसेनेत दिसते. राजकारणातील सध्याची स्थिती पाहता जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवरील  आपआपसातील मतभेद  मिटवले आहेत. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर  एक खासदार व दहा आमदार निवडून आणण्याचे शिवधनुष्य शिवसेना पेलण्याचे स्वप्न पाहत आहे, त्या कार्यकर्त्यांची मने जुळवण्यासाठी पक्षीय पातळीवरून प्रयत्न होणार का, असा सवाल शिवसैनिकांमधूनच उपस्थित होत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट रूजवली आहेत. ग्रामीण भागातील शाखाप्रमुखांचे केडर मजबूत असल्याने अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सेनेचे सदस्य निवडून आले आहेत. एकहाती सत्ता नसली तरी सोयीनुसार स्थानिक गटाशी आघाडी करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 2009 साली सेनेचे तीन आमदार निवडून आले होते.

2014 साली त्यात भर पडून सहा आमदार निवडून आले. निवडून आलेले उमेदवार कट्टर शिवसैनिक नसले तरी शिवसेना पक्षाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आहे. पूर्वाश्रमीच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांची जवळीक असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची की आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला, असा प्रश्‍न लोकप्रतिनिधींसमोर होता. जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांचा स्वत:चा एक गट आहे. म्हणूनच  सेनेच्या  काही लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात आपले निष्ठावंत कार्यकर्ते उभे केले होते. अशा स्थितीत नाराज शिवसैनिक कोणाच्या पाठीशी राहणार, असा प्रश्‍न आहे. जिल्ह्याने सहा आमदार दिले म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानतात; पण त्याप्रमाणे जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले जात नसल्याने जनतेमधून नाराजीचा सूरही उमटत आहे. 

शहरातील स्थिती आजही पहिल्यासारखीच आहे. त्यात कोणताही बदल नाही. प्रत्येकाचे जणू स्वत:चे संस्थान तयार झाले आहे. शिवसेना शहरात जरी भक्‍कम असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख ही शिवसैनिक म्हणून होण्यापेक्षा तो अमूक गटाचा शिवसैनिक यावरून होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे लोकप्रतिनिधींकडून  की पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून करून घ्यायची,  अशा कात्रीत येथील शिवसैनिक सापडला आहे. 

आज जरी अभिमानाने कार्यकर्ते स्वत:ला शिवसैनिक म्हणत असतील तर गटाच्या वर्चस्ववादामुळे निष्ठावंत कार्यकर्ता शिवसेनेपासून दुरावला असल्याची खंत काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. नेते येतात भाषणबाजी करून जातात. यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असली तरी गटातटाचे प्रश्‍न सुटणार नाहीत. 

केवळ फोटोसेशनसाठी एकत्र नको...

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील व कल्‍लाप्पाण्णा आवाडे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपआपसातील वाद मिटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ए .वाय.पाटील व के.पी.पाटील यांच्यातील वादावर पडदा टाकण्यास नेते मंडळींना यश आले आहे. केवळ फोटोसेेशनसाठी हातात हात घालून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी एकत्र येऊ नये तर गटतट विसरून एकत्र आल्यास कार्यकर्त्यांनाही बळ मिळणार असल्याचे मत निष्ठावंत शिवसैनिकांमधून व्यक्‍त होत आहे.