Sun, Mar 24, 2019 08:55होमपेज › Kolhapur › दुर्गेवाडी 27  वर्षांपासून  स्मशानशेडच्या प्रतीक्षेत!

दुर्गेवाडी 27  वर्षांपासून  स्मशानशेडच्या प्रतीक्षेत!

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 15 2018 10:36PMकोडोली : वार्ताहर

दुर्गेवाडी पुनर्वसन गावच्या स्थापनेपासून या गावातील मृत व्यक्‍तींवर रस्त्याच्या कडेलाच अंत्यसंस्कार करावे लागतात. नेतेमंडळी विकासाच्या नुसत्या गप्पाच मारून जातात पण गेली 27 वर्षे या गावाला जागा व स्मशानशेड मिळालेच नाही. 

दुर्गेवाडी गावाला स्मशानशेड कधी मिळणार याबाबत कोडोली ग्रामपंचायत मूग गिळून गप्प का आहे? असा सवाल दुर्गेवाडी ग्रामस्थांतून होत आहे.कोडोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुर्गेवाडी गावचे पुनर्वसन 27 वर्षांपूर्वी झाले आहे. कोडोली-बोरपाडळे रस्त्यावरील शेतकरी संघाच्या पेट्रोप पंपाशेजारी या दुर्गेवाडी गावची वस्ती आहे. कोडोली गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे गाव असल्याने या गावाकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने या गावातील गावकर्‍यांचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहे. त्याचबरोबर या गावात गटार, रस्ते, लाईट अशा अनेक समस्यांना येथील ग्रामस्थ तोंड देत आहेत.

निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी मात्र या गावात ठिय्या मांडून बसलेले असतात व आपली राजकीय पोळी भाजून घेतात. या गावातील ग्रामस्थांना विकासाच्या थापा मारून निघून जात असल्याने या गावातील स्मशान भूमीसाठी जागा व स्मशानशेडचा प्रश्‍न मात्र 27 वर्षे कोणासही सोडविता आलेला नाही. स्मशान जागा व स्मशान शेडसाठी या गावातील ग्रामस्थांनी कोडोली ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी मागणी करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर  पुनर्वसन विभागाच्या अधिकार्‍यांशीही याबाबत ग्रामस्थांनी संपर्क करूनही अधिकार्‍यांनाही यामध्ये लक्ष घालायला वेळ नाही.
गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. मात्र ही जागा स्मशानभूमीसाठी देण्यास पुनर्वसन विभाग तयार नाही.

त्यामुळे गावातील कोणीही व्यक्‍ती मृत झाल्यास गावातील  रस्त्याकडेलाच उघड्यावर सार्वजनिक अंत्यसंस्कार केले जातात. त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये तर पाऊस कमी होण्याची वाट पाहून मृतदेह घरामध्ये ठेवून नातेवाईकांना तिष्ठत बसावे लागते. या शिवाय एकाचवेळी एकापेक्षा जास्त व्यक्‍ती मृत झाल्यास अनंत अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ग्रामपंचायतीने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक विचार केला नाही तर मृत व्यक्‍तीवर ग्रामपंचायतीच्या दारातच अंत्यसंस्कार केला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.