Mon, Jul 22, 2019 13:54होमपेज › Kolhapur › प्राधिकरण म्हणजे काय रे भाऊ?

प्राधिकरण म्हणजे काय रे भाऊ?

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 10:58PMदोनवडे : वार्ताहर 

बालिंगे (ता. करवीर) गाव  हद्दवाढीच्या गावात समाविष्ट आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट सर्वच गावांनी हद्दवाढीला विरोध केला आहे. यासाठी सरकारने प्राधिकरण ही संकल्पना पुढे आणली पण प्राधिकरणाबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत.  प्राधिकरणाचे फायदे-तोटे, नियम याबाबत अनेक गावांत संभ्रमाचे वातावरण आहे. 

प्राधिकरणामुळे ग्रामपंचायतींना विकासाच्या द‍ृष्टिकोनातून कशी मदत होणार? कोणता रस्ता किती फूट होणार? घरफाळा व पाणीपट्टी किती वाढणार? बांधकाम परवाने कोणाकडून मिळणार? विविध प्रकारचे दाखले कोठे मिळणार? याची माहिती अजून कोणालाच नाही. याबाबत ग्रामपंचायतींनाही याची माहिती नाही. यामुळे नागरिकांतून तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

बालिंगे दीडशे वर्षांपूर्वी कात्यायनी येथून हलवून भोगावती तीरावर वसवण्यात आले. कळंबा तलावात गावचे सांडपाणी जाऊ नये हा उद्देश होता. त्यावेळी भोगावती रिव्हज पूल बांधकाम सुरू होते पायाखुदाईवेळी महादेवाचे बाल लिंग असलेला दगड सापडला यावरूनच गावचे नाव बालिंगे हे ठेवण्यात आले. सध्या गावाचा विस्तार वाढत चालला आहे गावची लोकसंख्या दहा हजारांवर आहे. गावात पूर्वेकडील व दक्षिणेकडील अनेक नागरी वस्तीचा समावेश झाला आहे. यामध्ये महालक्ष्मी पार्क, महालक्ष्मी नगर, साई पार्क, वरदराज पार्क, कोर्ट कॉलनी, आनंद कॉलनी, बटुकेश्‍वर कॉलनी, गजानन महाराज कॉलनी, दळवी कॉलनी, महेश्वर कॉलनी, रिंगरोड, शालिनी नगर, विनायक नगर, अनंत नगर या एकूण 14 कॉलनींचा समावेश आहे. हद्दवाढीत समाविष्ट गावांचा विकास करण्यात येणार आहे. गावातील कचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पेयजलमधून जिल्ह्यात बालिंगे येथे पहिली योजना मंजूर झालेली आहे.  24 तास पाणी मिळणारी ही पाणी योजना पूर्ण झाली आहे फक्त वीज कनेक्शन बाकी आहे. लवकरच ही योजना सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींचे विविध प्रकारचे  विकास निधी ग्रामपंचायतींना मिळणार का?  गायरान, देवस्थान जागेचे काय? पाणीपुरवठा योजनेचे काय होणार? रस्त्याबाबत नियोजन काय? शेतीतून कोणता रस्ता कितपत जाणार? हे सर्व स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.