Tue, Aug 20, 2019 15:12होमपेज › Kolhapur › लोगोमुळे ‘देवस्थान’ला नवी ओळख

लोगोमुळे ‘देवस्थान’ला नवी ओळख

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 1:10AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मंदिर, परंपरा आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या लोगोमुळे देवस्थान समितीला नवी ओळख मिळेल, असा विश्‍वास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लोगो अनावरणप्रसंगी व्यक्‍त केला. देवस्थान समितीच्या लोगोसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून कलाकारांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये कोल्हापूरच्या पाचगाव येथील  पोस्टल कॉलनीतील गौरीश विलास सोनार यांच्या लोगोची निवड करून त्यांना 21 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपात हा कार्यक्रम  झाला. 

महेश जाधव म्हणाले, देवस्थानच्या अखत्यारीत असलेल्या मंदिरांना व तेथील व्यवस्थापनास या लोगोमुळे नवी ओळख मिळणार आहे. समितीचे लेटर पॅड, अध्यक्ष व पदाधिकार्‍यांचे व्हीजिटिंग कार्ड, पावती बुक यावर हा लोगो असेल. हा लोगो देवस्थानसाठी आयडॉल ठरून अंबाबाई मंदिराची ओळख सर्वदूर करून देईल.

देवस्थानच्या लोगो स्पर्धेसाठी 91 स्पर्धकांकडून 125 पेक्षा जास्त लोगो समितीकडे आले होते. प्रा. अजय दळवी, शाहीर राजू राऊत, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत आणि कलानिकेतनचे प्राचार्य पोतदार यांनी परीक्षणाचे काम केले. निवड समितीने चार फेर्‍यांतून लोगोची निवड केली. निवडीमध्ये मंदिर, परंपरा आणि संस्कृतीचा विचार करण्यात आला. यातून सोनार यांच्या लोगोची निवड झाली. त्या पाठोपाठ राधानगरीचे अजित पाटील व कोथरूड, पुणे येथील रश्मी कोरे यांना द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले. पर्यटनवाढीच्या द‍ृष्टीनेही या लोगोला अधिक महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्‍त केले. 

यावेळी लोगो निवड समितीचे सर्व सदस्य, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजीराव साळवी, सुदेश देशपांडे, धनाजी जाधव, राजू मेवेकरी, नंदकुमार मराठे आदी उपस्थित होते.