Thu, Aug 22, 2019 13:23होमपेज › Kolhapur › असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ 

असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ 

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:21AMइचलकरंजी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाची पहिली बैठक आज नागपूर येथे मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत यंत्रमाग कामगार, शेतमजूर, बेकरी, इंजिनिअरिंग, कपडे धुणार्‍या, भांडी घसणार्‍या महिला कामगार, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षा, टेम्पा,े लॉरीचालक यांच्यासह 123 उद्योगांतील कामगारांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी 15 ऑगस्टपासून नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महामंडळास राज्यस्तरीय सल्लागार मंडळ नेमून त्यात वृत्तपत्र विक्रेत्यांसह सर्व घटकांचे प्रतिनिधी सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आले.

नागपूर येथील रवी भवन येथील बैठकीस प्रधान सचिव (कामगार) राजेश कुमार, असंघटित कामगार विकास आयुक्‍त पंकज कुमार, आमदार सुरेश हाळवणकर, आ. शेख असिफ शेख रशीद, मंडळाचे सदस्य अभिजित राणे, शिवाजी काकडे, मिलिंद कांबळे, राजकुमार शर्मा, चंद्रकांत धुमाळ, रमेश शेंडगे, शिवाजी पाटील, कामगार आयुक्‍त नरेंद्र पोयम हे सदस्य उपस्थित होते.

गृहनिर्माण योजना, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना वृद्धाश्रम योजना यासारख्या इतर अनेक योजना राबवण्याच्या असून त्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळांची अनेक कार्यालय राज्यात सुरू असून त्यामार्फत असंघटित कामगारांसाठी राबवावयाच्या योजनांचे व्यापक प्रसिद्धी व प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय सुद्धा यावेळी झाला.

पुढील क्षेत्रातील कामगारांची प्राथमिक टप्प्यात नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला- अगरबत्ती बनविणे, शेतमजूर, कृषी अवजारे हाताळणे, पशुसंवर्धन, मादक पेय उत्पादन आणि विक्री, ऑटोमोबाईल्स, पाव भट्टीवरील काम (बेकरी), बँड वाजविणे, बांगड्या बनविणे, मनी बनविणे व ओवणे, ब्युटिशियन, बिडी उत्पादन, सायकल दुरुस्ती, टिकली उत्पादन, लोहार काम, बोटी/होडी चालविणे, पुस्तक बांधणी, विटभट्टी, ब्रश उत्पादन, दारू भट्टीवरील काम, इमारती आणि रस्ते दुरस्ती, बल्ब उत्पादन, बैलगाडी/उंट गाडीवरील कामे, कत्तलखाने, केबल आणि दूरदर्शनवरील कामे, वेताची छडी / बोरू/वाद्य व्यवसाय, सुतारकाम, चादरीवरील विणकाम, काजू प्रक्रिया (कॅश्यू प्रोसेसिंग), खाद्य पेय व्यवस्था करणे (कॅटरिंग), कापडावरील कशीदाकारी (चिकान वर्क), सिनेमा सेवा, कापड छपाई, क्लब आणि कँटिन सेवा, प्रशिक्षण सेवा, कथ्था निर्मिती व प्रक्रिया, मिठाई व्यवसायातील काम, बांधकाम, तंबू/मंडप याची उभारणी/कार्यक्रमाचे सुशोभिकरण व कार्यक्रमासाठी भांडी पुरविणारे कामगार, कुरियर दुग्ध व्यवसाय व उत्पादनाचे वाटप, डाटा एन्ट्री प्रक्रिया, पेट्रोलियम उत्पादनाचे वाटप, घरेलू काम, रंगद्रव्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि विद्युत उपकरणाची दुरस्ती, विद्युत विलेपक (इलेक्ट्रोेप्लेटिंग), भरत काम, लिफाफे बणविणे, फाटके आणि दारू काम उत्पादन, मत्स्य व्यवसाय, मत्स्य प्रक्रिया,

पुष्प संवर्धन आणि हार बनविण, पिठाची गिरणीवरील कामे, चप्पल उत्पादक, वन उत्पादन प्रक्रिया, ओत शाळा (फौंड्री), बगीचा काम व उद्यान दुरस्ती व कामे, कापड उत्पादन,  सरकी काढणे/वटणे (जिर्निग), काथ उत्पादन, सोनार काम, केस कर्तनालय, हातकाम, हातगाडी व फिरता व्यवसाय, ओझे वाहून नेणारे काम, आरोग्य सेवा, मध गोळा करणे, उद्यान व पुष्प संवर्धन, हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवा, कुलपे उत्पादन, सर्वसाधारण अंग मेहनतीचे काम, मसाला निर्मिती, काडीपेटी निर्मिती, लाकडे गोळा करणे, खाण व खनिकर्म काम, वर्तमानपत्रांकाचे वाटप, स्वयंसेवी संस्थांमधील कामे, तेल काढणे, पॅकिंग आणि पॅकेजिंग, खानपान सेवा, पापड बनविणे, पेट्रोलपंप व त्यावरील कामे, लोणची बनविणे, वृक्षारोपणाची कामे (वृक्षारोपण कामगार अधिनियम  वगळून, इतर), प्लास्टिक उत्पादन, चिनीमातीची भांडी, यंत्रमाग, छपाईची कामे, दगड खाणीतील काम, कचरा गोळा, भात प्रक्रिया, रिक्षा ओढणे, मिठागरावरील कामे, रेती काढणे, सॉ मीलमधील कामे, झाडू मारणे कामगार / माल वाहून नेणारे कामगार स्कॅव्हेनजिंग), सुरक्षा सेवा, रेशीम उत्पादन, सर्व्हिस स्टेशनवरील कामे, गुरे/मेंढ्या पाळणे, बूट पॉलिश करणे, दुकाने व आस्थापना सेवा, अल्प भूधारक शेती, साबुण निर्मिती, खेळाचे साहित्य बनविणे, स्टीलची भांडी व भांडे पात्र बनविणे, स्टोन कॅ्रशिंग, टेलीफोन बूथ सेवा, साफ सफाई, मंदिरातील सेवा, तेंदू पाने गोळा करणे, लाकूड व्यवसाय, तंबाखू प्रक्रिया, ताडी गोळा करणे, खेळणी बनविणे, वाहतूक सेवा (चालविणे, साफ करणे), कपडे इस्त्रीची कामे, वॅर्कशॉपमधील कामे, वेल्डिंग. 

तीन वर्षांसाठी एकदाच फी आकारणी

असंघटित कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने तीन वर्षांसाठी एकदाच 80 रुपये फी आकारून करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नोंदणी ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत करण्यात येईल. त्यासाठी कामगारास आधार कार्ड व तो असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचे स्वतः लिहिलेले हमीपत्र द्यावे लागेल. त्यासाठी मालकाचे शिफारस पत्राची गरज असणार नाही. त्यामुळे नोंदणी करणे सुलभ होईल. तसेच कामगाराला महामंडळामार्फत ओळखपत्र देणे, नैसर्गिक मृत्यू विमा योजना, अपघात मृत्यू विमा योजना, अंत्यविधीसाठी सहाय्य, शैक्षणिक सहाय्य योजना व भविष्यनिर्वाह योजना सुरुवातीच्या टप्प्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.