Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Kolhapur › तक्रार घेण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येतो!

तक्रार घेण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येतो!

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:24PM कोल्हापूर : विजय पाटील 

लाचखोरी खूपच वाढली आहे... हातात पैसे टेकवल्याशिवाय कुठलेही काम होत नाही... तो अमुक-अमुक अधिकारी खूप ‘खातो’... असा संवाद सरकारी, निमसरकारी कार्यालयांच्या आवारात हमखास ऐकायला मिळतो. आपले काम अडेल किंवा जाणीवपूर्वक अडवले जाईल, या भीतीपोटी इच्छा नसताना अनेक जण लाच देण्यास तयार होतात. लाच घेणारे सरकारी अधिकारी-कर्मचारी तर एखादे सावज टिपावे अशा पद्धतीने सापळा लावतात. मग काय, लाच मिळाली तरच काम होते. लाच मिळाली नाही, तर कामात त्रुटी काढून दिरंगाई केली जाते. जनतेची कामे करण्यासाठीच ज्यांना पगार दिला जातो, अशी यंत्रणा जर लाच घेतल्याशिवाय काम करत नसेल, तर आता लोकांनीच लाच का द्यायची? असा निर्धार करून लाचखोरांना वठणीवर आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात वाढला. जनतेची कामे ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत. असे असताना लाच हा विषय बंद व्हायला हवा होता; पण असे काही चित्र नाही. उलट लाच दिली तरच काम होईल, असे जाणीवपूर्वक चित्र जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांबाबत निर्माण झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच नव्हे, तर राज्यभरात सर्वत्रच लाचखोरी वाढत चालली असल्याचे कारवाईवरून दिसू लागले आहे; पण या लाचखोरीचा राक्षस संपवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही जय्यत तयारी केली आहे. ‘आम्ही तुमच्या दारात तक्रार घेण्यासाठी येतो!’ अशी मोहीमच राबवली जात आहे. 
कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे हा तुमचा हक्क आहे. मग लाच का द्यायची? असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावरून ठळक आवाहन करण्यात आले आहे; पण प्रत्यक्षात मात्र सरकारी कार्यालयांतील बहुतेक मंडळी काम घेऊन येणार्‍यांना नाडण्यासाठीच बसलेली दिसतात. काम होणारच नाही, असा आव आणून त्यांना खिंडीत पकडतात. मुळात काही सरकारी बाबूंनी आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा सावज आहे, असे मानलेले असते. या सावजाला टिपण्यासाठी सगळी जोडणी केलेली असते. त्यामुळे काम घेऊन जाणारा माणूस संबंधित कार्यालयातून बाहेर पडला की, त्यांना   कोणीतरी रेडीमेड दलाल गाठतोच. तो मदत करण्याच्या बहाण्याने एखाद्या सल्लागारासारखा आव आणून मार्गदर्शन करतो. नंतर इतकी रक्कम द्या, लगेच काम होईल बघा, असे साळसूदपणे सांगतो. मग सौदा ठरतो. 

लोकांनी निर्भयपणे तक्रार करावी, यासाठी एसीबीनेसुद्धा यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. यासह मोबाईल क्रमांकावर व्हॉटस् अ‍ॅपवरून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्याशिवाय हेल्पलाईनवरून संपर्क साधणार्‍यांच्या दारात म्हणजे घरी जाऊन संबंधित अधिकारी तक्रार घेतील, अशी नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तक्रारदारांची नावे गुप्तच राहतील, याची खबरदारीसुद्धा घेतली जाते. त्यामुळे या सुविधांचा लाभ आता जनतेने घ्यायला हवा.     (क्रमश:)