Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Kolhapur › ऐन पावसाळ्यात पन्हाळगड तहानलेला!

ऐन पावसाळ्यात पन्हाळगड तहानलेला!

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:29AMपन्हाळा ः राजू मुजावर

ऐन पावसाळ्यात पन्हाळगडाला  जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.गेले  चार दिवस वारणा नगर येथील टँकरने नागरिकांना पाणी दिले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  देखभाल दुरुस्तीसाठी असमर्थता दाखवत आहे, तर पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यास नगरपालिका सक्षम नाही. त्यामुळे पाणी उपसा करणार्‍या मोटारी दुरुस्ती कोणी करायची? यासाठी  पाणीपुरवठा बंद पडला आहे.दरम्यान,सोमवारी रात्री उशीरा पन्हाळ्यावर नाराजीतून काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

पन्हाळा येथे कासारी नदीवरून  पाणी पुरवठा होतो, ही योजना जीर्ण झाली असून या ठिकाणी नवीन सुधारित योजना राज्य शासनाने मंजूर केली असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेस घरघर लागल्याने वारंवार येथील मोटारी बंद पडतात व पन्हाळगडाचा पाणीपुरवठा बंद होतो. पन्हाळ्यात गेली चार दिवस जॅकवेल जवळ पाणी उपसा करणार्‍या मोटारीचे वायंडिंग जळाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे या मोटारीच्या दुरुस्तीसाठी येणार्‍या खर्चासाठी निधी उपलब्ध नाही.

हा खर्च नगरपालिकेने करावा व ही योजना पालिकेने ताब्यात घ्यावी, असे प्राधिकरणाने कळवले आहे. त्यामुळे मोटार दुरुस्ती लालफितीत अडकल्याने नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे वारणा साखर कारखान्यांमार्फत विनय कोरे यांच्या वतीने दररोज दहा टँकर पाणी पन्हाळा नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याने नागरिकांतून वारणा कारखान्यासाठी आभार व्यक्त होत आहेत. जळालेल्या मोटारी दुरुस्ती साठी खर्च पंचेचाळीस हजार रुपये असल्याने हा खर्च कोण करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.जीवन प्राधिकरणचे अभियंता दिपंकर यांनी पालिकेने खर्च करावा व ही योजनाच चालवावी, असे कळवले आहे. याबाबत तातडीने नगराध्यक्षा व नगरसेवक चैतन्य भोसले यांनी मुंबई येथे जाऊन विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे  निवेदन दिले आहे. 

आजपासुन पुढे सहा महिने पन्हाळा येथील पुरवठा योजना  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने  सुरळीत करून चालू ठेवावा, असे आदेश दिले आहेत. वारणानगर येथील  कारखान्यामार्फत टँकरद्वारे पाणी मिळत असल्याने विनय कोरे यांचे आभार व्यक्त होत आहेत.