Thu, Apr 25, 2019 06:15होमपेज › Kolhapur › नाल्यांच्या दूषित पाण्याचा पंचनामा

नाल्यांच्या दूषित पाण्याचा पंचनामा

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:29AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीर प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने नियुक्त झालेल्या समितीने बुधवारी पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शहरातील 12 नाल्यांवर प्रत्यक्ष जाऊन पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने पृथक्करणासाठी तातडीने चिपळूण येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. प्रयागपासून सुरुवात झालेली पाहणी शिरोली पुलावर बापट कॅम्पनजीक समाप्त झाली. प्रयाग येथे नितळ असणारे पाणी बापट कॅम्पपर्यंत काळेकुट्ट आणि केंदाळात माखलेले, दुर्गंधी सुटलेले आढळलेले आहे. 

पंचगंगा नदीत शहरातील नाल्यातून मैलामिश्रित पाणी थेट मिसळत असल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार करवीर प्रांताधिकारी यांनी या नाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिकेला नोटीस काढल्यानंतर बुधवारी समितीमार्फत तपासणीही करण्यात आली. या समितीमध्ये याचिकाकर्ते दिलीप देसाई, महापालिका पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडले, उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांचा समावेश होता. 

या समितीने प्रयागपासून पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली. तेथे पाणी अतिशय शुद्ध व नितळ आढळले. तेथून पुढे मात्र दुधाळी नाला, जयंती नाला, राजहंस नाला, बावडा नाला, रमणमळा नाला, राजाराम बंधारा, बापट कॅम्प आदी ठिकाणी प्रदूषणाने कळस गाठल्याचे निदर्शनास आले. काळेकुट्ट पाणी, पाण्यावर पसरलेला हिरवा तवंग आणि सुटलेली दुर्गंधी, वाढलेले केंदाळ अशा परिस्थितीत जाऊन पाण्याचे नमुने संकलित केले गेले.

प्रांताधिकार्‍यांकडे आज सुनावणी
प्रदूषणासंदर्भात गुरुवारी दुपारी एक वाजता करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पर्यावरण अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक, उपप्रादेशिक अधिकारी यांना उपस्थित राहण्याची नोटीस काढण्यात आली आहे. 

आठ दिवसांत येणार अहवाल
नमुने घेतल्यापासून 24 तासांच्या आत प्रयोगशाळेत पृथक्करणासाठी पाठवावे लागत असल्याने तातडीने ते बुधवारीच चिपळूणला रवाना करण्यात आले. येत्या आठ दिवसांत याचा अहवाल येणार आहे. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल असल्याने उच्च न्यायालयातील सुनावणीस तो लाभदायी ठरणार आहे.