Wed, Apr 24, 2019 19:57होमपेज › Kolhapur › पाणी गळती, नाले सफाई, डेंग्यूवरून प्रशासन धारेवर

पाणी गळती, नाले सफाई, डेंग्यूवरून प्रशासन धारेवर

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजारामपुरीसह ठिकठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पावसाळा सुरू झाला तरी नाले सफाई झालेली नाही. त्यातच डेंग्यूचा फैलाव होत आहे. तरीही प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी स्थायी समिती सभेत प्रशासनाला धारेवर धरले. सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

 सत्यजित कदम, डॉ. संदीप नेजदार, कविता माने, प्रतिज्ञा निल्ले, राहुल माने, दीपा मगदूम, गीता गुरव, सविता घोरपडे आदींनी चर्चेत भाग घेतला. शहरात डेंग्यूबाबत जनजागृती करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने डेंग्यूबाबत प्रबोधन सुरू आहे. टायर जप्तीची कारवाई सुरू आहे. प्रबोधनात्मक पत्रक, व्हॉटस् अ‍ॅपवर डॉक्यूमेंटरी तयार करून प्रबोधन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. पांडुरंग नगरी येथे नाला सफाई झालेली नाही, असे सदस्यांनी सांगताच मंगळवारपर्यंत पूर्ण करून घेऊ, असे प्रशासनाने स्पष्ट केले.  

राजारामपुरीतील गळतीबाबत  सदस्यांनी जाब विचारला. ही गळती काढण्याचे नियोजन केल्याचे प्रशासनाने सांगितले. कंटेनर दुरुस्तीचे काय झाले? खराब कंटेनरचे प्रमाण जास्त आहे व दुरुस्तीचे प्रमाण कमी आहे. संपूर्ण कंटेनर एक महिन्यात दुरुस्त करून घेण्यासाठी बाहेरुन हजेरीवर वेल्डर उपलब्ध करून घ्या, अशी सूचना सदस्यांनी केली.