Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Kolhapur › सहलीवरील नगरसेवकांवरही ‘वॉच’

सहलीवरील नगरसेवकांवरही ‘वॉच’

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 11:48PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापौरपदाची निवडणूक ईर्षेची बनली आहे. काँग्रेस, ताराराणी आघाडीबरोबरच शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कोणताही धोका नको म्हणून नगरसेवकांना सहलीवर नेले जात आहे. त्याठिकाणीही कारभार्‍यांचा नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवण्यात येत आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनाही पहिल्यांदाच बुधवारी ‘ट्रीप’वर नेले जात आहे. परिणामी शुक्रवारी होणार्‍या मतदानावेळी ‘काहीही घडू शकते’, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे कारभारी कोल्हापुरातच ‘ठाण’ मांडून आहेत. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे; परंतु काठावरचे बहुमत असल्याने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद देण्यात आले आहे; परंतु स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीतील सहकार्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला हे पद दिले असल्याचे नगरसेवकांचे मत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीसाठी ‘वेगळी चर्चा’ अशी मागणी केली जात आहे. त्यासाठीच शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येते; परंतु सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने आता यापुढे शिवसेनेला जास्त ‘किंमत’ द्यायची नाही, असे ठरविले असल्याचे सांगण्यात येते. 

‘भाजप-ताराराणी’ आज ट्रिपवर

महापालिकेत पहिल्यांदाच भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाने प्रबळ विरोधी गट अस्तित्वात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पदासाठी निवडणूक लागते. सत्ताधारी व विरोधी यांच्यात निवडणूक होत असते; परंतु यापूर्वी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना कधीही ट्रिपवर नेण्यात आलेले नव्हते. यंदाची महापौरपदाची निवडणूक मात्र त्याला ‘अपवाद’ ठरली आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना ट्रिपला येणे सक्‍तीचे करण्यात आले आहे, पण कुठे जाणार ते सांगितलेले नाही. बुधवारी सकाळी ‘बॅगा घेऊन यायचे आणि गाडीत बसायचे’ अशा सूचना दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नगरसेवकांतूनही शुक्रवारी मतदानादिवशी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्यात

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मोठा दगाफटका झाल्याने महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना गोव्याला रवाना करण्यात आले होते. उर्वरित नगरसेवकांना सोमवारी पाठविण्यात आले. सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहेत; परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे कारभारी कोल्हापुरातच थांबले आहेत. भाजप-ताराराणी आघाडीच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत. सद्यस्थितीत विरोधकांकडून फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते का? याचा कानोसा घेत आहेत.