Sun, Sep 23, 2018 02:06होमपेज › Kolhapur › थेट पाईपलाईन योजनेसह ‘अमृत’च्या कामावर ‘वॉच’

थेट पाईपलाईन योजनेसह ‘अमृत’च्या कामावर ‘वॉच’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

केंद्र व राज्य शासनाकडून शहरातील विकासकामांसाठी निधी देण्यात येतो. परंतु, हा निधी योग्यप्रकारे खर्च होत नाही. प्रकल्प रखडले जातात. नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे यापुढे थेट पाईपलाईन योजनेसह अमृत योजनेतून सुरू करण्यात येणार्‍या विकासकामांचा लेखाजोखा करण्यासाठी खासगी एजन्सी नेमून वॉच ठेवला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच शनिवारी महापालिकेतील आढावा बैठकीत ही माहिती दिली. 

बैठकीचा वृत्तांत आ. अमल महाडिक यांनी सांगितला. ते म्हणाले, शहरांतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी 115 कोटी, ड्रेनेज व्यवस्थेसाठी 72 कोटी, पंचगंगा घाटासाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 68 कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. विकासकामाचे उद्घाटन झाल्यापासून ते काम पूर्ण होण्यापर्यंत निधी योग्यप्रकारे खर्च होण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एजन्सी नेमली जाईल. थेट पाईपलाईन योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही स्वतंत्र अधिकारी नियुक्‍त करण्यात येणार आहे. 

महापालिकेला मंजूर झालेला दहा कोटींचा निधी खर्च न झाल्याने शासनाकडे परत गेल्याचे सांगून महाडिक म्हणाले, शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध कामांच्या पाठपुराव्यासाठी एक अधिकारी नियुक्‍त करावा. नगरोत्थान योजनेचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून 275 कोटींचा नवीन डीपीआर तयार करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. तसेच थेट पाईपलाईन अंतर्गत जलवाहिन्या मेपर्यंत टाकून पूर्ण कराव्यात, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.  बैठकीला भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक सुनील कदम, ईश्‍वर परमार, किरण नकाते, राजसिंह शेळके, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, विजयसिंह खाडे आदींसह इतर उपस्थित होते.