Sun, Jul 21, 2019 00:04होमपेज › Kolhapur › कचरा प्रकल्प पुन्हा पेटला!

कचरा प्रकल्प पुन्हा पेटला!

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 11:16PM

बुकमार्क करा
कसबा बावडा : प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. नेहमीच पेटणार्‍या कचरा प्रकल्पातील कचर्‍यात रविवारी दुपारी एचडीपी लायनर (लिचड जमिनीत मुरू नये म्हणून वापरण्यात येणारे आच्छादन) जळाले. यामुळे धुराचे लोट आकाशात पसरले. परिसरात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले. चार कि.मी. अंतरावरून हे धुराचे लोट दिसत होते. सुमारे पंधरा लाख रुपयांचा कागद आगीच्या भक्षस्थानी पडला.

लाईन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचरा पेटण्याचा प्रकार आता नित्याचा झाला आहे. संपूर्ण प्रकल्प परिसर कचर्‍याचे माखून गेला आहे. कचरा प्रक्रिया  प्रकल्पातील कचरा सतत पेटत असताना काही दिवसांपूर्वी आयुक्‍तांनी परिसराला भेट दिली. सुरक्षा भिंत ज्या ठिकाणी ढासळली आहे ती पुन्हा बांधण्याबाबत निर्देश दिले; पण या प्रकल्पात सतत पेटणार्‍या कचर्‍यावर आतापर्यंत निर्बंध आणण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

रविवारी पेटत्या कचर्‍यात एचडीपी लायनरबरोबर कचर्‍यातील प्लास्टिक गोळा करणार्‍या महिलांनी साठवलेले प्लास्टिकही जळाले. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे प्रकल्प परिसरातील आसमंत काळवंडला. दुपारी तीनच्या सुमारास कचर्‍याबरोबर आच्छादनाचा कागद पेटला. त्यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले. अग्‍निशमन दलाच्या दोन गाड्यांनी एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, प्रकल्पातील इतर ठिकाणचा कचरा पेटतच होता.

आग जुन्या एसटीपीच्या बाजूने भडकली होती. ती विझविण्यासाठी या ठिकाणी कार्यरत महापालिका कर्मचारी चव्हाण बादली घेऊन धावला; पण तो प्रयत्न केविलवाणा ठरला. यावेळी हा कर्मचारी किरकोळ भाजला. त्याला उपचारासाठी पाठवण्यासाठी कोणी सहकारी उपलब्ध नव्हते.

मंगळवारी आपण सर्व नगरसेवक प्रत्यक्ष कचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी या आणि परिस्थितीची माहिती घ्या. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. यातून मार्ग काढूया, असे पत्र महापौर आणि परिसराच्या नगरसेविका सौ. स्वाती यवलुजे यांनी सर्व नगरसेवकांना दिले आहे.