Wed, Feb 26, 2020 02:47होमपेज › Kolhapur › नववर्षाचे जंगी स्वागत; तरुणाईची धूम!

नववर्षाचे जंगी स्वागत; तरुणाईची धूम!

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:43AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप देत जिल्ह्यात रविवारी नववर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. मध्यरात्री बारा वाजले अन् सर्वत्र उत्साहाला उधाण आले. फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाई अशा वातावरणात तरुणाईने धुमधडाक्यात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. नववर्ष स्वागताचा जल्लोष पहाटेपर्यंत सुरू होता.

‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करण्यात येत होती. आज सकाळपासून या तयारीला वेग आला होता. यामुळे सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. विविध उपक्रमांद्वारे नववर्ष स्वागताचे प्लॅनिंगही करण्यात आले होते. त्यानुसार विविध ठिकाणी त्याची तयारी करण्यात तरुणाई दिवसभर गुंग होती. सायंकाळनंतर ‘सेलिब्रेशन’च्या ठिकाणी जाणार्‍यांची रस्त्यावर गर्दी वाढत गेली. यामुळे अनेक मार्गांवर दुचाकी, चारचाकींची गर्दी होती.

विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही खास व्यवस्था करण्यात आली होती. आकर्षक रोषणाई, सजावटींसह विविध ‘थीम’ साकारत नववर्षाचा उत्साह द्विगुणीत केला जात होता. हॉटेल्स्मध्ये विशेष पार्ट्यांचेही आयोजन करण्यात आले होते. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर रात्री उशिरापर्यंत तरुणाई थिरकत होती. यामध्ये युवकांसह युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. शहरासह जिल्ह्यातील बहुुतांशी हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, घरगुती खानावळी आदी सर्वच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. अनेकांनी आगाऊ बुकिंग केल्याने, बहुतांशी हॉटेल्स् रात्री नऊ-दहा नंतर फुल्लच झाली होती. यामुळे दहानंतर ‘क्षमस्व: जेवण संपले आहे’ असे फलकही दिसत होते. मांसाहारी जेवणाबरोबरच शाकाहारी हॉटेल्स्मध्येही गर्दी कमी नव्हती.

अनेकांनी सहकुटुंब नववर्षाचे स्वागत केले. घराचे अंगण, टेरेस आदी ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करत सहकुटुंब भोजनाचा आनंद घेत सरत्या वर्षाला निरोप दिला. सहकुटुंबासह नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आदींनी एकत्र येत नववर्ष स्वागताचा आनंद साजरा केला. यामुळे घरोघरीही रात्री उशिरापर्यंत जल्लोषाला उधाण आल्याचेच चित्र दिसत होते.

विविध सामाजिक उपक्रमांद्वारेही अनेकांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. रुग्णांना फळे वाटप, गरजूंना साहित्य वाटप आदींसह वृद्धाश्रम, अनाथाश्रम आदी ठिकाणी स्नेहभोजन अशा उपक्रमाद्वारेही नववर्षाचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी देवदर्शन घेत, नववर्षाचे स्वागत केले. दर्शनासाठीही सायंकाळनंतर अनेक मंदिरांत गर्दी होती.

नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यारस्त्यांवर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबरोबर हुल्लडबाजीवरही लक्ष ठेवण्यात येत होते. हॉटेल, रेस्टॉरंटसह गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी अशा निसर्गरम्य परिसरातही ‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन सुरू होते, अशा परिसरावरही पोलिसांनी लक्ष ठेवले होते. चौकाचौकातील पोलिसांसह अनेक ठिकाणी पोलिसांची गस्तीपथके फिरतानाचे चित्र जिल्ह्यातील अनेक भागात दिसत होते.

मध्यरात्री बारानंतर जल्लोषाबरोबरच एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत होता. अनेकांचे मेसेज बॉक्स सायंकाळनंतरच फुल्ल झाले होते. सोशल मीडियावर तर आकर्षक शुभेच्छांचीबरसातच सुरू होती. यासह प्रत्यक्ष भेटून, मोबाईल, दूरध्वनीद्वारेही एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यात येत होत्या.

कडेकोट बंदोबस्त

कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी रविवारीची रात्र पोलिसांनी रस्त्यावर काढली. जिल्ह्यात तब्बल अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा सायंकाळपासून चौकाचौकात थांबून होता. रात्री उशिरापर्यंत शहरातील 27 ठिकाणी नाकाबंदी सुरू होती.

सरत्या वर्षाला निरोप देताना सर्वसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली. मद्यप्राशन करून वाहने चालविणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात येत होती. रात्री आठनंतर कुटुंबासोबत अनेक जण बाहेर पडले. शिवाजी चौक, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, दसरा चौक, कसबा बावडा, शाहूपुरी, राजारामपुरी यासह राधानगरी रोड, गगनबावडा रोडवरील हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. 

ओपनबारवर छापे 

शहरातील व शहरालगतची मैदाने, निर्जन माळ, उद्याने आदी ठिकाणी पोलिसांनी रात्री छापे टाकले. अशा ठिकाणी ओपनबार बनणार नाहीत, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली. भरधाव वाहने चालविणार्‍यांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.