कोल्हापूर : प्रतिनिधी
वारणानगर येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरीतील संशयित व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचा निलंबित पोलिस अधिकारी सूरज विष्णू चंदनशिवे, हवालदार दीपक पाटील व मैनुद्दीन मुल्लाविरुद्ध ‘सीआयडी’ने मंगळवारी पन्हाळा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आठशे पानी दोषारोपपत्रात चोरीतील मोठी रक्कम मालमत्ता खरेदीवर गुंतविल्याचे पुराव्यासह नमूद करण्यात आले आहे.
3 कोटी 18 लाख व 6 कोटी रुपये चोरीप्रकरणी दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, चंदनशिवे, मैनुद्दिन मुल्ला, दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळेसह 9 जणांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. जी. बेहरे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोन अधिकार्यांसह पाच पोलिसांचा समावेश आहे.
चंदनशिवेसह संशयितांनी वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटवर दि. 13 मार्च 2016 छापा टाकून झडती घेतली होती. कपाटातील 6 कोटी रुपयांची रोकड पथकाने ताब्यात घेतली. संबंधित रक्कम रेकॉर्डवर न दाखविता संशयितानी त्यावर संगनमताने डल्ला मारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
‘सीआयडी’चे अपर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड, डी.डी.काबळे यांनी आज, सकाळी चंदनशिवेसह तिघाविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. संशयिताविरुध्द भक्कम पुरावे उपलब्ध झाले आहेत. चोरीत लुटलेली रक्कम मालमत्ता खरेदण्यावर गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. महत्वाचे पुरावे ठरणारे कागदपत्रेही उपलब्ध झाले आहेत,असेही तपासाधिकार्यांनी स्पष्ट केले.