Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Kolhapur › दुर्घटना घडल्यावरच जाग येते...

दुर्घटना घडल्यावरच जाग येते...

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:33PMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

एखादा मोठा अपघात झाला की, पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक, आर.टी.ओ. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची धावपळ सुरू होते. बैठका घेऊन कारणमीमांसा केली जाते. कोण जबाबदार आणि कोणाची चूक, याबाबत तपास सुरू होतो. आतापर्यंतच्या अनेक अपघातांनंतर अशा बैठका झाल्या असतील, तर मग त्याची फलनिष्पती काय, असाच प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो आहे. वरातीमागून घोडे दामटण्याचा हा प्रकार आणखी किती दिवस चालणार, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आतापर्यंत देशात आणि राज्यात झालेल्या मोठ्या अपघातांमध्ये वाहनचालकांची चूक प्रकर्षाने ठळक झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे, वळणे, रस्त्यालगत असणारी झाडे आणि दिशादर्शक फलक नसल्याने अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. याचाच अर्थ वाहनांतील दोषांमुळे अपघात कमी आणि मानवी चुकांमुळे अधिक होत असल्याचे पुढे आले आहे. असे असताना अपघात नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत, याचे कोडे मात्र सर्वसामान्यांना उलगडत नाही. अधिकार्‍यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याशिवाय काहीच उपाय शोधले जात नाहीत का, असाही प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होतो आहे. 26 जानेवारीला रात्री उशिरा कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून पंचगंगेत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर सरकारी विविध कार्यालयांच्या वास्तवाच्या मुद्द्यांवर सध्या सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

वाहन परवाना देण्यापासून ते वाहनाची सुस्थिती पाहण्याची मुख्य जबाबदारी आर.टी.ओ.ची आहे. मालवाहतूक वाहन असेल तर त्यात मर्यादेपेक्षा अधिक माल भरणे, प्रवासी वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे येथपासून ते महामार्गावर वाढणारी अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी कोण सांभाळणार, याचेही उत्तर वाहनधारकांपासून प्रवाशांपर्यंत सर्वांनाच हवे आहे. कोल्हापूरच्या चारही दिशेला जाणार्‍या महामार्गावर आर.टी.ओ. आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांची पथके नेहमीच गस्त घालत असताना किंवा एकाच ठिकाणी टेहळणी करीत असताना दृष्टीस पडतात. ही पथके नेमके काय काम करतात आणि कोणाची तपासणी करतात, याचाही उलगडा होणे आवश्यक आहे. एखादा मोठा अपघात होतो, तेव्हा ही यंत्रणा कोठे असते आणि नंतर काय करते, याचेही स्पष्टीकरण सर्वसामान्यांना हवे आहे. महामार्गावर वाहने अडविणे आणि ‘अर्थ’ शोधण्यासाठी अडवणूक करणे एवढेच काम या यंत्रणेकडून केले जात असल्याचा सर्वसान्यांतून आरोप होत आहे. त्याची दखल आता सर्वच पातळीवर घेण्याची आवश्यकता आहे.

महामार्ग सुरक्षा पथक कुठे होते?

एखादा मोठा अपघात घडतो त्यावेळी सर्व खात्यांच्या यंत्रणेअगोदर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीच पोहोचत असतात, हे आतापर्यंतच्या अनेक घटनांवेळी दिसून आले आहे. शिवाजी पुलावर 26 जानेवारीला झालेल्या अपघातावेळीसुद्धा हेच दिसून आले. बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील कार्यकर्ते आणि त्यापाठोपाठ पत्रकार आणि पोलिसच घटनास्थळी पोहोचले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. सतेज पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनीही घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्यासाठी झोकून दिले. यावेळी आर.टी.ओ., महामार्ग सुरक्षा पथकाची यंत्रणा कोठे होती, याचा जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे अनेक कोल्हापूरकर उघडपणे बोलत आहेत.