Fri, Feb 22, 2019 01:23होमपेज › Kolhapur › प्रॉपर्टी कार्डची प्रतीक्षा

प्रॉपर्टी कार्डची प्रतीक्षा

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:14AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

निवासी, व्यापारी कारणांसाठी वापरल्या जाणार्‍या तब्बल 34 हजार मिळकतींना अद्याप सात-बाराच आहे. हे मिळकतधारक गेल्या अनेक वर्षांपासून प्रॉपर्टी कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय पातळीवर अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रश्‍नाची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्‍त होत आहे.

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मूळ गावठाणात असलेल्या मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड आहे. मात्र, गावठाणाशेजारी विस्तारलेल्या आणि शहरातच असलेल्या तब्बल 34 हजार मिळकतींना अद्याप सात-बारा उतारा आहे. हा उतारा बंद करून संबंधित मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.

सात-बारा असलेल्या शहरातील ‘ए’ व ‘बी’ वॉर्डातील मिळकती सर्वाधिक आहेत. यासह ई वॉर्डातही सातबारा असणार्‍या मिळकती आहेत. रंकाळा टॉवर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, साने गुरुजी वसाहत, आपटेनगर, साळोखेनगर, देवकर पाणंद, जरगनगर, रामानंदनगर आदी परिसरातील बहुतांश सर्वच मिळकतींचा सात-बारा उतारा आहे.

या सर्व मिळकती बिनशेती आहेत. यामुळे त्याचे प्रॉपर्टी कार्ड होणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी एकाच गट क्रमांकातील निम्म्या क्षेत्राचीच बिनशेती झाली आहे, तर निम्म्या क्षेत्राचा प्रत्यक्ष निवासी, वाणिज्य कारणांसाठी वापर होत असला तरीही अजूनही त्याची नोंद शेती अशीच आहे.

शहरात असूनही मिळकतींचा सात-बारा निघत असल्याने मिळकतधारकांना महापालिकेसह महसूलचाही कर भरावा लागत आहे. यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि शहरातील सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.