होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील तलाठी ‘लॅपटॉप’च्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील तलाठी ‘लॅपटॉप’च्या प्रतीक्षेत

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 12:39AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : अनिल देशमुख

तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठीचा निधीही वर्ग केला आहे. आठ महिने झाले तरी याबाबतचा निर्णय न झाल्याने जिल्ह्यातील तलाठी ‘लॅपटॉप’च्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाने सात-बारा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या सात-बारा अपडेट करण्याचे काम सुरू आहे. यापुढे सात-बार्‍याचे काम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू राहणार असल्याने तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. याकरिता राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात 543 लॅपटॉप खरेदी केले जाणार आहेत. याकरिता जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाला वर्ग केला आहे. हा निधी मार्च महिन्यात शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे देण्यात आला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात येणार असल्याने त्याची राज्य पातळीवर एकत्रितच खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील तलाठ्यांकडे 2010 पासून लॅपटॉप आहेत. हे लॅपटॉप तलाठ्यांनी स्वखर्चातून खरेदी केले आहेत. तत्कालिन जिल्हाधिकार्‍यांनी लॅपटॉप घेण्यास तलाठ्यांना भाग पाडले. मोठ्या संख्येने लॅपटॉप घेऊनही बाजारभावापेक्षा अधिक रकमेचे हे लॅपटॉप तलाठ्यांच्या गळ्यात मारण्यात आले होते. या लॅपटॉपची क्षमता आता कमी झाली आहे. सध्या सुरू असलेले ऑनलाईनचे कामकाज आणि तलाठ्यांचे जुने लॅपटॉप यामुळे काम करताना तलाठ्यांची डोकेदुखी वाढत आहे. अनेक वेळेला हे लॅपटॉप बंद पडणे, सिस्टीम सर्पोट न करणे आदी प्रकार होत असल्याने तलाठ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही तलाठ्यांना वेळेत लॅपटॉप मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, राज्याच्या माहिती व तंत्र विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. लॅपटॉप स्वतंत्रपणे जिल्हा पातळीवर खरेदी करता येणे शक्य आहे का, याबाबतही प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी तलाठी अद्याप लॅपटॉपच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.

एटीएम मशिन पडून

ऑनलाईन सात-बारा कोणालाही, कोठेही, कधीही मिळावा यासाठी एटीएमद्वारे उतारा देण्यात येणार आहे. हे मशिन जिल्ह्यात दाखल झाले आहे. सुमारे दोन महिने होत आले तरीही या मशिनचा वापर सुरू झालेला नाही. ऑनलाईनचे कामच पूर्ण झाले नसल्याने या मशिनचा अजून वापर सुरू केला नसल्याचे सांगण्यात येते.

सर्व्हर डाऊनच

तलाठ्यांचे ऑनलाईन सात-बार्‍यांचे काम सुरूच आहे. गेल्या वर्षभरापासून सर्व्हरचा असलेला प्रश्‍न आजही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर बंदचे प्रमाण वाढतच असून, त्याचा परिणाम ऑनलाईन सात-बारा अपडेटेशनवर होत आहे.