Fri, Jul 19, 2019 23:10होमपेज › Kolhapur › वाघमारे, तावडे, गायकवाड कनेक्शनची चौकशी

वाघमारे, तावडे, गायकवाड कनेक्शनची चौकशी

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येतील जेरबंद संशयित परशुराम वाघमारेसह त्याचे साथीदार बंगळूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या सतत संपर्कात होते, अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या चौकशीतून पुढे आल्याचे वरिष्ठ सूत्राकडून समजते. ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी डॉ. वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, परशुराम वाघमारेसह त्याचे साथीदार एकमेकांच्या संपर्कात असावेत, असाही तपासाधिकार्‍यांचा संशय आहे. ‘सीडीआर’द्वारे कनेक्शनचा शोध घेण्यात येत आहे, असेही समजते.

अप्पर पोलिस महासंचालक तथा एसआयटीचे प्रमुख संजयकुमार कर्नाटकातील अधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. येत्या तीन-चार दिवसात संजयकुमार कोल्हापुरात दाखल होत आहेत. कर्नाटक पोलिस यंत्रणेकडून झालेल्या तपासाचा स्थानिक अधिकार्‍यांकडून आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होईल, असे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

मारेकरी वाघमारे पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात काही तरुण मित्रांच्या संपर्कात होता, अशी माहितीही चौकशीतून पुढे आली आहे.

तपासाकडे एसआयटीसह सीबीआयची नजर

वाघमारे व साथीदारांनी अत्यंत नियोजनबद्ध कट करून गौरी लंकेश यांची हत्या केल्याने ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्येच्या कटात मारेकर्‍याचा सहभाग असावा का? असा संशय आहे. त्यामुळे एसआयटीसह सीबीआयचे कर्नाटक पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

वाघमारेची चौकशी महत्त्वपूर्ण ठरणार

पुरोगामी चळवळीतील चारही नेत्यांच्या हत्यांसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाल्याचा कर्नाटक फॉरेन्सिक लॅबचा निष्कर्ष असल्याने कॉ. पानसरे हत्येच्या अनुषंगाने वाघमारे याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे, असेही एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

वाघमारेची बुधवारी चौकशी शक्य

महाराष्ट्र एसआयटीचे पथक उद्या (मंगळवारी) दुपारी बंगळूरकडे रवाना होणार आहे. बुधवारी सायंकाळी वाघमारेकडे चौकशी शक्य आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी सहायक तपासाधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडेसह अधिकारी, पोलिस असे 10 जणांचे पथक रवाना होत आहे, असेही सांगण्यात आले.