Fri, Aug 23, 2019 15:35होमपेज › Kolhapur › शिवसेनेचे भाजपच्या विरोधात मतदान

शिवसेनेचे भाजपच्या विरोधात मतदान

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 12:40AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली. शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी महापौरपदासाठी काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांना, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांना मतदान केले. यापूर्वी माजी महापौर अश्‍विनी रामाणे यांच्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहून तटस्थ होते. तर हसिना फरास यांच्यावेळी ते गैरहजर होते. मात्र, आता शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराविरुद्ध पहिल्यांदाच थेट मतदान केले. परिणामी, राज्यात भाजपसोबत असलेली शिवसेना महापालिकेत काँग्रेससोबत असे चित्र झाले आहे. 

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना राहिली आहे. त्याचे फलित म्हणूनच शिवसेना गटनेता नियाज खान यांना परिवहन समिती सभापतिपद देण्यात आले आहे. आता महापौर-उपमहापौर निवडणुकीत कोणासोबत राहायचे, याबाबत पक्षीय पातळीवर कोणतेच आदेश आले नव्हते. परंतु, शुक्रवारी सकाळी पुन्हा घडामोडी घडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच शिवसेना राहिली. 

दरम्यान, सध्या ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौरपद राखीव असून 15 मेनंतर अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी पद राखीव आहे. त्यामुळे यवलुजे यांना सुमारे साडेपाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. निवडीनंतर यवलुजे यांच्या समर्थकांनी महापालिका परिसरात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. त्यांच्या प्रभागात मिरवणूक काढण्यात आली. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयात सागर यवलुजे असतात. त्यामुळे यवलुजे यांची मिरवणूक बराच काळ अजिंक्यतारा कार्यालयाजवळ होती. डॉल्बीवर अजिंक्यतारामधील कर्मचार्‍यांसह तरुणांचा जल्लोष सुरू होता.       

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक फेट्यात...

महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्याला सहलीवर गेले होते. शुक्रवारी सकाळी महापालिकेत आल्यानंतर सर्व नगरसेवकांनी फेटे परिधान केले होते. महापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उमा बनछोडे व दीपा मगदूम यांनीही फेटे परिधान केले होते. तरीही त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. दरम्यान, सभागृहात असताना मावळत्या महापौर फरास यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार करण्यात आले. 

थेट पाईपलाईनला प्राधान्य  :  यवलुजे

सर्वप्रथम थेट पाईपलाईन योजना मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे नूतन महापौर यवलुजे यांनी पत्रकारांना सांगितले. येत्या आठ दिवसांत योजनेच्या कामाची माहिती घेण्यासाठी फिरती केली जाईल. त्यानंतर त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लावून लाईन बझारमधून झूम प्रकल्प शहराबाहेर नेण्यासाठी प्रयत्न करू. त्याबरोबरच प्रशासनाबरोबर योग्य समन्वय साधून शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही यवलुजे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी गटनेतापदी मुरलीधर जाधव शक्य

कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला नवा गटनेता निवडावा लागणार आहे. माजी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांची गटनेतापदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. जाधव यांनी यापूर्वी सलग पाच वर्षे विरोधी पक्षनेतापद भूषविले होते. तसेच ते ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. परिणामी, त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.