Thu, Apr 25, 2019 07:39होमपेज › Kolhapur › मतदार ओळखपत्र होणार ‘स्मार्ट’

मतदार ओळखपत्र होणार ‘स्मार्ट’

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:54PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटो असलेले मतदान ओळखपत्र आता हद्दपार होणार आहे. त्याजागी ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपात रंगीत मतदार ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशी ओळखपत्र देण्यात प्रारंभ करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मतदार ओळखपत्रांची विशिष्ट ओळख आहे. मात्र, ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोमुळे अनेकदा मतदार ओळखतच नाहीत. संपूर्ण ओळखपत्रच ब्लॅक अँड व्हाईट असल्याने, त्यावरील मजकूरही नीट वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे. या कार्डसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक कव्हरचीही गुणवत्ता अनेकदा चांगली नसल्याने, अनेक ठिकाणी पुरावा म्हणून वापरले जाणारे हे कार्ड खिशातून बाहेर काढणेही मतदारांसाठी लाजीरवाणे ठरत होते. या कार्डचे स्वरूपच बदलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार या कार्डची जागा आता स्मार्ट कार्डने घेतली आहे.

ज्या मतदारांचे मतदार यादीतील फोटो खराब झाले आहेत, नीट ओळखता येत नाहीत, अशा फोटो खराब असलेल्या मतदारांची निवडणूक आयोगानेच यादी तयार केली आहे. अशा मतदारांकडून रंगीत छायाचित्रे घेऊन त्यांना हे नव्या स्वरूपातील ‘स्मार्ट कार्ड ’ देण्यात येत आहे. जिल्ह्यात हे नवीन स्मार्ट कार्ड वितरणाचे काम सुरू झाले आहे. यासह नव्याने नोंदणी केल्या जाणार्‍या मतदारांनाही यापुढे निवडणूक ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्डच मिळणार आहे. आयोगाकडून दिले जाणारे हे कार्ड मोफत दिले जात आहे.

ज्या मतदारांचे यापूर्वीचे चांगले ओळखपत्र आहे अशा मतदारांना मात्र, स्मार्ट कार्ड स्वरूपातील ओळखपत्र हवे असल्यास, त्याकरिता 25 रुपये मोजावे लागणार आहेत. हे पैसे भरून, त्याकरिता आवश्यक अर्ज भरून, त्यासोबत रंगीत छायाचित्र प्रशासनाकडे जमा केल्यास संबंधित मतदाराला त्याचे स्मार्ट कार्ड स्वरूपातील मतदार ओळखपत्र मिळणार आहे. तसेच त्याच्या मतदार यादीतील पहिले ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र बदलून त्या ठिकाणी रंगीत छायाचित्र वापरले जाणार आहे.