होमपेज › Kolhapur › जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा : मेघना एरंडे

जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा : मेघना एरंडे

Published On: Mar 09 2018 5:18PM | Last Updated: Mar 09 2018 7:42PMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रत्येकामध्ये कस्तुरी दडलेली असते. त्याची जाणीव झाली की जीवन जगण्याला एक दिशा मिळते. यश, अपयश यानंतरच्या गोष्टी आहेत; पण मिळालेल्या  जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा,  असे  प्रसिद्ध अभिनेत्री व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांनी सांगितले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब व झी युवा चॅनलच्या वतीने आयोजित ‘कस्तुरी अ‍ॅन इन्स्पीरेशन’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भावना व शब्दांचा सुरेख मेळ घालून आपल्या जादूमयी आवाजाने बच्चे कंपनीच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या मेघना एरंडे यांनी यावेळी विविध निंजा, डोरेमॉन यासारख्या कार्टूनचे आवाज काढून उपस्थित महिलावर्गाची मने जिंकली.

हॉटेल सयाजी येथील मेघमल्हार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास  महापौर सौ. स्वाती यवलुजे, दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी योगेश जाधव, सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. अरुंधती महाडिक, सौ. प्रतिमा सतेज पाटील, विद्याताई पोळ व विविध क्षेत्रांतील महिला उपस्थित होत्या. यावेळी सौ. स्मितादेवी जाधव यांच्या हस्ते मेघना एरंडे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मुलाखतीच्या माध्यमातून मेघना एरंडे यांच्या अभिनयाचेही विविध पैलू उलगडले. डबिंग आर्टिस्ट म्हणून कामाची सुरुवात कशी झाली, असे विचारता त्या म्हणाल्या, लहानपणापासून अभिनयाची आवड होती. शालेय स्तरावरील स्नेहसंमेलनांत भाग घेत गेले. यातूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. प्रत्येकाच्या आवाजामध्ये एक वेगळेपण असते. याची जाणीव झाल्याने अभिनयाबरोबरच मला डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली. अभिनयापेक्षा डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणे एक आव्हान होते; पण शब्दांवर प्रभुत्व व  आवाजावर नियंत्रण या दोन गोष्टींमुळे डबिंग आर्टिस्ट म्हणून यशस्वीपणे काम करत आहे. मुंबईत 5 हजारांहून अधिक डबिंग आर्टिस्ट आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करून स्वत: सिद्ध करताना बरीच कसरत करावी लागली.

कार्टून कलाकारांना आवाज देताना कोणती आव्हाने पेलावी लागतात, असे विचारता मेघना एरंडे म्हणाल्या, मालिकांबरोबरच  कार्टून फिल्म या आबालवृद्धांच्या पसंतीस उतरत आहेत. परदेशी भाषांतील अनेक कार्टून हिंदी भाषेत डब केल्या जातात. यासाठी आपल्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे. शब्दांचा उच्चार स्पष्ट असणे गरजेचे आहे. पडद्यावरील कार्टूनच्या चेहर्‍यांवरील हावभाव पाहून त्याप्रमाणे आवाजातील चढउताराने पडद्यावरील कलाकारांमध्ये जिवंतपणा आणावा लागतो. मेघना एरंडे यांनी यावेळी निंजा, शिंचान, डोरेमॉनचे  कार्टून मालिकेतील आवाज तसेच हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, करिना कपूर, हेमा मालिनी यांचा हुबेहुब आवाज काढून महिलांची दाद मिळवली.

नॅशनल जीओग्राफी तसेच अन्य कार्यक्रमांसाठी आवाजाचा पोत कसा असावा, हे सांगत असताना त्यांनी ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हे बालगीत स्वत: जपानी भाषेत सादर  करत उपस्थित महिलांकडून इंग्रजीमधून म्हणून  घेतले.  तर ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबचा कार्यक्रम हा उपक्रम चांगला आहे, हे त्यांनी विविध वयोगटांतील महिलांच्या आवाजात सांगितले. मेघना एरंडेची मुलाखत आर.जे. रसिका कुलकर्णी व रत्नप्रभा पाटील यांनी घेतली. यावेळी झी युवा वाहिनीवर सुरू असलेल्या बापमाणूस मालिकेतील पूजा पोवार, श्रुती अत्रे, पल्‍लवी पाटील, ऋता दुर्गुळे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे, असे पूजा पोवार यांनी सांगितले. झी युवा वाहिनीवरील ही मालिका वेगळ्या धाटणीची आहे. त्यामुळे प्रत्येकाने ती आवर्जून पाहावी, असे सांगितले.

‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या उपक्रमाचे कौतुक

या कार्यक्रमात मेघना एरंडे यांनी डबिंग आर्टिस्ट होण्यासाठी जीभेच्या हालचाली कशा असाव्यात, हे सांगितले. तसेच उपस्थित महिलांकडून काही संवादही म्हणून घेतले. महिलांचे संवाद ऐकून तुम्हीही चांगल्या डबिंग आर्टिस्ट होऊ शकता, असे सांगत महिला दिनाचे औचित्य साधून महिला शक्‍तीला एकत्रित करून त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा विकास व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे मेघना एरंडे यांनी कौतुक केले.