होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्याचे व्हिजन

शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्याचे व्हिजन

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 1:08AMकोल्हापूर : विजय पाटील

शुभम एम. ए. झालाय; पण चार वर्षे नोकरीसाठी धडपडतोय. तिकडे एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगार द्यायची तयारी आहे. परंतु, त्यांना शोधूनही व्यवस्थापक मिळेना. व्हीएमसी, सीएनसी मशिनसाठी शेकडो ऑपरेटरच्या जागा रिक्त आहेत. साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च कमी करणारे अधिकारी मिळेनात. गुर्‍हाळघरांसाठी प्रशिक्षित गुळव्या नाही. म्हणजे शेकडो रोजगार आहेत; पण यासाठी लागणारे कुशल तरुण नाहीत, अशी स्थिती आहे. आता मात्र असे होणार नाही. कारण शिवाजी विद्यापीठाने स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेऊन बृहत् आराखड्यात रोजगार देणार्‍या शिक्षणाचे नियोजन केले आहे.

शिवाजी विद्यापीठाचा आगामी पाच वर्षांसाठीचा बृहत् आराखडा बनवण्यात आला आहे. हा बृहत् आराखडा म्हणजे विद्यापीठाचे व्हिजन असल्याने त्याला महत्त्व आहे. शिक्षणक्षेत्रात सध्या आमूलाग्र बदल केले जात आहेत. यातील एक भाग म्हणजे रोजगार पुरवणारे शिक्षण, ही संकल्पना राबवली जात आहे. 

यामध्ये स्थानिक उद्योग, व्यवसायांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना तसे अभ्यासक्रम बनवून प्रशिक्षणाची सुविधा शिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठानेही बृहत् आराखड्यातही या गोष्टीवर भर दिला आहे.

रोजगाराच्या स्थानिक संधी मोठ्या आहेत. या संधीसाठी आवश्यक शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जाणार आहे. अगदी कोल्हापुरात वाढत जाणार्‍या पर्यटन व्यवसायाचाही यामध्ये विचार करण्यात आला आहे. शिक्षणातून निर्माण होणारी बेरोजगारी यामुळे कमी होणार आहे.

कोल्हापूरची बलस्थाने आणि संधी 
कोल्हापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील फौंड्रीत देशात सर्वाधिक गुणवत्ता असणारे कास्टिंग तयार केले जाते. साखरेच्या उत्पादनासाठी हा परिसर राजधानी मानला जातो. कोल्हापुरी गुळाचा महिमाही याच तोडीचा आहे. अलीकडे तर गुळाची पावडर सर्वात जास्त निर्यात कोल्हापुरातून केली जाते. इचलकरंजीला तर महाराष्ट्राचे मँचेस्टर मानले जाते. हुपरी चांदीच्या वस्तूंचे आगार आहे. कोल्हापुरात पाऊणकोटी इतक्या संख्येने पर्यटक एका वर्षात येऊन गेले आहेत. कोकण, कर्नाटक, गोवा यांच्या प्रवासाचा मध्यबिंदू कोल्हापूर असल्याने टुर्स आणि ट्रॅव्हलसाठी येथे संधी आहे. खाद्यक्षेत्र ही नवी ओळख बनत आहे. कृषी आणि सहकारात तर सर्वाधिक नवे रोजगार उपलब्ध आहेत. एकूणच हजारो रोजगार योग्य शिक्षण घेतलेल्यांची वाट पहात आहेत.