Wed, Jul 08, 2020 06:25होमपेज › Kolhapur › कोरोनाची गती... मार्च आणि मे २०२०

कोरोनाची गती... मार्च आणि मे २०२०

Last Updated: May 25 2020 5:12PM

संग्रहित छायाचित्र- अभ्युदय रेळेकर

कोरोनाचा गुणाकार कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ द्यायचा नाही, देणार नाही अशी ठाम भूमिका एक महिन्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. त्याचवेळी लॉकडाऊनचे फायदे त्यांनी सांगितले होते. मात्र आज एक महिन्यानंतरची अवस्था पाहिली तर कालच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जनतेला संबोधित करताना कोरोनाचा गुणाकार मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं म्हटलंय. अत्यंत कडक लॉकडाऊन असताना, सर्वप्रकारची काळजी घेतली जात असताना हे असं कसं घडतंय. हे का घडतंय असा प्रश्न प्रत्येकाला पडला असणार हे निश्चित. चला तर त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करु या.

कोरोनाचा प्रसार वाढणार तसेच कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार याबाबतचे सूतोवाच २८ मार्चच्या माझ्याच लेखात मी केले होते. सरकारी इच्छा किती जरी असली तरी लोकांनी काही नियम किंवा खबरदारीला तिलांजली दिली की काय अवस्था होते हे आपल्याला माहीत आहे. कोरोनाच्या बाबतीतही तसेच घडले आहे. लोकांनी कोरोना होऊ नये यासाठीची खबरदारी घेतली नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे परदेशातून आपल्याकडे आलेला कोरोना आपल्या नकळतच  आपल्यात कसा भिनत गेला ते कळलेच नाही. आपण गर्दी केली, मास्क वापरले नाहीत. खरेदीसाठी दुकानांच्यापुढे झुंबड उडवली. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याच्या नावाखाली सूचना देऊनही एकत्र येऊन थाळीनाद, टाळ्या पिटण्याचे कार्यक्रम झाले. जरा ढील दिली की कोणतीही काळजी न घेता पहाटेपासून बाजारात कशी गर्दी होत होती, याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला. मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांच्यावर  वेगवेगळ्या पोस्ट टाकून आपण कोरोनाच्या गांभिर्याची चष्टा करण्यात मश्गुल होतो. त्याचवेळी चोरपावलाने कोरोना आपल्यामध्ये शिरकाव करत होता. त्याकडे आपण साफ-साफ दुर्लक्ष केले. यामुळे काय झाले ते आता आपण पाहात आहोत. 

कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड नकळतपण होत आहे. आपल्याला ते कळतही नाही. यातून आपण तिसऱ्या टप्प्यात कधी गेलो ते कळलंच नाही. याला कोणतंही सरकार, सुरक्षा यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा किंवा इतर कुणीही जबाबदार नाही. याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे आता कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. सरकारच्या सर्वच प्रयत्नांना आपणच हरताळ फासला. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. कारण आपण योग्य खबरदारी घेतली नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मला वाटते अजूनही वेळ गेलेली नाही. आजही आपण काळजी घेतली तर कोरोना आपल्या जवळपासही फिरकणार नाही. पण लक्षात कोण घेतो अशी अवस्था आपली आहे.

दोन महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. वैद्यकीय परिप्रेक्षातून पाहिले तर ही बाब आपल्या लक्षात येते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संखा कितीतरी पटीना आज वाढताना दिसत आहे. त्यापाठिमागे वैद्यकीय सुविधा हेही एक मोठे कारण आहे. आपण थेट मुद्यावरच येऊया. देशभरात आणि राज्यात मार्च महिन्यात खूपच कमी प्रमाणात कोरोना चाचणी केंद्रे उपलब्ध होती. चाचणीची किटही खूपच कमी प्रमाणात उपलब्ध होती. त्यानंतर देशांतर्गत चाचणी किटची सुविधा झाली. त्याचबरोबर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी किटची आयात करण्यात आली. कीट आल्यानंतर कोरोना चाचणी केंद्राच्या संख्येतही वाढ करण्यात आली. 

सुरुवातीला राज्यात २-३ ठिकाणीच कोरोना चाचणी केंद्रे होती. आता काही अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी केंद्रे सुरू झाली आहेत. एवढेच नव्हे तर एकाच जिल्ह्यात दोन-तीन चाचणी केंद्रे सुरू झाली आहेत. काही मोठ्या शहरांमध्ये तर अधिक प्रमाणात कोरोना चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. काही खासगी वैद्यकीय संस्थांना देखील कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. याबाबतचा अंदाजही मी २८ मार्चच्या माझ्या लेखात दिला होता. त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह केसेस कमी दिसत होत्या. कारण त्यावेळी आताच्या तुलनेत नगण्य कोरोना चाचणी होत होत्या. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण नोंदण्याचे प्रमाण कमी दिसत होते. याचा अर्थ त्यावेळी कोरोनाग्रस्त नव्हते असे नाही. तर ते होतेच. मात्र त्यांची नोंद होत नव्हती.

कोरोनाग्रस्तांची नोंद आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत तज्ज्ञांशी बोलल्यावर एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे फक्त कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. खरे तर ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी आहे. तसेच जे  रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त आहेत. उदा. मधुमेह, रक्तदाब, किडणीविकार, पोटाचे आजार, वृद्धत्वामुळे निर्माण होणारे विकार यांना जर कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती गंभिर होताना दिसते. सर्वसामान्य व्यक्तीला जर कोरोनाची लागण झाली तर, जरी आजपर्यंत कोरोनावर उपचार करणारे ज्ञात औषध नसले तरी रुग्ण बरे होत आहेत. कारण या रुग्णांच्यामधील प्रतिकारशक्ती तसेच कोरोनामुळे झालेल्या इतर आजारांवर ताबडतोबीने होत असलेले उपचार हे आहे. आयुष मंत्रालय तसेच केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देषांनुसार यासंदर्भात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. त्यातून बहुतांश कोरोनाग्रस्त बरे होऊन सुखरूप घरी जात आहेत.

आणखी चार-पाच दिवसाने चौथा लॉकडाऊनही संपत आहे. त्यानंतर लगेच सगळे सुरळीत सुरू होईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. खरे तर आपण सगळ्या सरकारी नियमांचे पालन केले, तर आपण स्वतःला वाचवू शकू. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या यापुढेही वाढत जाणार हे मात्र निश्चित आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या सुरू झाल्याने हे आकडे दररोज शेकडो, हजारोनी वाढतील. मात्र घाबरून जाण्यापेक्षा दक्ष राहणे गरजेचे आहे. 

सरकारनेही हे आकडे वाढणार ही बाब लक्षात घेऊनच मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. राज्यभर हजारो बेड तयार ठेवले आहेत. तसेच आणखी हजारो बेड तयार होत आहेत. आपण मात्र अजूनही काळजी घेतली तर त्यातल्या एखाद्या बेडवर अपले नाव असणार नाही हे निश्चित. काळजी घेऊया. स्वतःला वाचवूया. देश वाचवूया.