Thu, Jul 18, 2019 00:01होमपेज › Kolhapur › सत्तेसाठी लोकांची माथी भडकवली जाताहेत : आसबे

सत्तेसाठी लोकांची माथी भडकवली जाताहेत : आसबे

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 02 2018 1:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आज ठराविक लोकांकडेच सत्ता आणि पैसा आला आहे. सत्तेसाठी लोकांची माथी भडकवली जात आहेत. बहुजन समाजाला बहुजनांच्या विरोधात लढविले जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी केले.

मराठा स्वराज्य भवन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘मराठा कालचा आणि आजचा’ या विषयावर त्यांनी शुक्रवारी पहिले पुष्प गुंफले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव हिलगे होते.

आसबे म्हणाले, चातुर्वर्णीय व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. अस्पृशांना जवळ केले. त्यांचे विचार हे सर्वांना घेऊन जाणारे होते. पेशवाई काळात शुद्रांवर अनेक निर्बंध घालण्यात आले. मराठी माणसाला जाग यायला नको, असा चुकीचा इतिहास लिहिला.

महात्मा फुलेंनी खरा इतिहास लोकांपुढे आणला. चातुर्वर्णीय व्यवस्था कशी चुकीची आहे, हे लोकांना सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी समतेची भूमिका मांडली. शिक्षणामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. आपण कोण आहोत, कोठे जायाचे आहे, हे थोर पुरुषांनी समजावून दिले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाजाला एकत्र घेऊन चांगल्या दिशेने राजकारण केले. कर्मवीर भाऊराव पाटील हे गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटले. त्याच महाराष्ट्रात आज शिक्षणाचे खासगीकरण झाले आहे.आज केवळ सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. जातीय दंगली घडवून स्वत:चा स्वार्थ साधला जात आहे. तरुणाईने सण, उत्सवात न गुरफटता शिक्षणाची कास धरून वाटचाल करावी. यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, गणी आजरेकर, अशोक माळी, क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव आदी उपस्थित होते.